मंत्री, खासदार,आमदार यांना गावबंदी – गावात येऊनच दाखवा
आक्रमक भुमिका – निवडणुकीवर बहिष्कार, पदांचे राजीनामा, पुतळा दहन, नेत्यांचे फोटो उतरवले – शाईफेकीचा इशारा, साखळी उपोषण
धाराशिव – समय सारथी टीम
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झाला असुन राजकीय नेते, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. मराठा आता रस्त्यावर उतरला असुन या आंदोलनाचा धसका सत्ताधारी, विरोधक व प्रशासनाने घेतला आहे. 200 पेक्षा अधिक गावात बंदी केली आहे.
सत्ताधारी विरोधक असलेल्या आजी माजी मंत्री, खासदार,आमदार यांना गावबंदी केली असुन हिम्मत असेल तर गावात येऊनच दाखवा असा सज्जड दम दिला आहे. चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष यासह बस झाले नेत्यासाठी आता फक्त जातीसाठी या घोषणा देत समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाज आक्रमक झाला असुन काही ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घातला असुन राजकीय पदांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा देण्यात आले आहेत. आरक्षणाला विरोध करणारे व आरक्षण ण देणाऱ्या नेत्याचे सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर काही ग्रामपंचायत व इतर कार्यालयात भिंतीवर लावलेले सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो उतरवले गेले तर मंत्री यांच्या अंगावर शाईफेकीचा इशारा देण्यात आला आहे तर धाराशिव शहरासह अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरु केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त गावांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याने मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांना गाव बंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भुम, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, धाराशिव व कळंब या तालुक्यातील लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरून मोर्चा काढत आहेत व गावाच्या प्रवेशद्वार येथे प्रवेश बंदीचे बॅनर लावले आहेत.
मराठा आरक्षण मिळत नसल्याने धाराशिव तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतचे सदस्य कालिदास गायकवाड यांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या मतावर निवडून आलो असून सरकार दिशाभूल करीत आहे व शासनाच्या भूमिकेला कंटाळून राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेश पदाधिकारी तथा कावळेवाडीचे सरपंच ऍड अजित खोत यांनी गावबंदीसह मंत्री, खासदार, आमदार यांच्यावर शाईफेक करण्याचा इशारा दिला.
मराठा आरक्षण मागणीसाठी राज ठाकरे व मनसे पक्ष कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने मनसे शेतकरी सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शाहूराज माने यांनी राजीनामा दिला आहे, त्याबाबतचे पत्र त्यांनी राज ठाकरे याना पाठविले आहे. जोपर्यंत पक्ष व राज ठाकरे मराठा आरक्षण बाबत ठोस भूमिका जाहीर करीत नाहीत तोपर्यंत पक्षाचे कोणतेही पद / जबाबदारी स्वीकारणार नाही असे माने यांनी म्हण्टले आहे.
धाराशिव तालुक्यातील जागजी गावच्या ग्रामपंचायत मधील सहा ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीवर ग्रामस्थांनी एकत्रित येत बहिष्कार टाकला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समस्त गावकऱ्यांनी एकत्र येत या मतदानावर बहिष्कार टाकला असून या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
ईट गावातील गावकरी आक्रमक झाले असून ग्रामपंचायत कार्यालयातील आजी माजी आमदार व सर्वपक्षीय राजकीय नेते यांचे फोटो काढण्यात आले व त्याजागी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा फोटो लावण्यात आला आहे. राहुल मोटे, राणाजगजीतसिंह पाटील, सुजितसिंह ठाकुर यांचे फोटो काढून टाकले.जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयात राजकीय नेत्यांचे फोटो लावण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला आहे.
सर्व नालायक राजकीय पक्षांच करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशी घोषणाबाजी करीत धाराशिव जिल्ह्यातील खेड येथील ग्रामस्थानी सर्वपक्षाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन तो भर चौकात पेटवून दिला व एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.
कळंब तालुक्यातील मोहा येथील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने विजयादशमी निमित्ताने रावण धहन करण्यात आले. रावण दहना बरोबर मराठा आरक्षणाला विरोध करणारे नेते गुणरत्न सदावर्ते , छगन भुजबळ,नारायण राणे, रामदास कदम यांच्या प्रतित्माक पुतळ्याला जोडे मारूण त्यांचे दहन करण्यात आहे. याप्रसंगी एक मराठा लाख मराठा तसेच मराठा आरक्षण ला विरोध करणाऱ्या नेत्या विरुद्ध जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.