धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित चोराखळी येथील महाकाली कला केंद्र स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. महसूल व पोलिस विभागाच्या पाहणी अहवाल व शिफारशी नंतर कायदा आणि सुव्यवस्था, अनेक तक्रारीच्या अनुषंगाने हे आदेश दिले आहेत. कला केंद्र परवाना धारक राजाभाऊ सीताराम माळी यांना याबाबत तसे कळविले आहे, त्यामुळे हे केंद्र बंद होणार का हे पाहावे लागेल.
यापुर्वी 5 कला केंद्राचे परवाने जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केले होते त्यानंतर महाकाली हे एकमेव कला केंद्र सुरु होते मात्र त्यालाही कारवाईचा दणका दिला आहे. दबंगगिरी, अनेक पळवाटा काढुन हे कला केंद्र सुरु होते मात्र नियमभंग व कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी आता ठोस भुमिका घेतली आहे.
परवाना अर्ज नामंजूर तरीही कला केंद्र सुरु, पळवाटा
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र चालु करण्यासाठी राजाभाऊ माळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता, तो 28 एप्रिल रोजी निकाली काढत अर्ज नामंजूर केला होता. पोलिस अधीक्षक यांनी 23 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना एक लेखी अहवाल पाठवला, त्यानुसार माळी यांनी महाकाली कला केंद्र हे अक्षय साळुंखे यांना चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिले आहे. कला केंद्रात पारंपरिक वाद्यावर कला सादर करणे अपेक्षित असताना साउंड सिस्टीमवर सांस्कृतिक नृत्य करताना मिळून आलेले आहे.
कला केंद्रामध्ये कला सादर करणारे कलाकार यांचे माहितीबाबतचे कागदपत्रे सादर करणेबाबत कला केंद्र चालविणारे यांना मागणी करुन देखील त्यांनी सदर माहिती सादर केलेली नाही. भाडेतत्वावरील कला केंद्र चालक अक्षय साळुंखे यांचेविरुद्ध कला केंद्रासमोर 5 ऑगस्ट 25 रोजी मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटामध्ये भांडण तक्रारी होवुन पोलीस ठाणे येरमाळा येथे कलम 189 (2), 191 (2) (3), 190, 115 (2), 352, 351 (2) (3) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. कला केंद्रामध्ये भविष्यात भांडण तक्रारी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कला केंद्राचे मूळ चालक राजाभाऊ सिताराम माळी यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय दाखल केलेल रिट याचिकेचा अंतिम निकाल लागे पर्यंत महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र कायमस्वरुपी बंद करण्याची शिफारस केली होती, कळंब येथील उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व तपासणी करून चौकशी अहवाल 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी यांना सादर केला त्यानुसार कला केंद्रात अनेक नियमांचा भंग व त्रुटी असल्याचे नमुद केले.
उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अहवालात अनेक त्रुटी उघड
उपविभागीय दंडाधिकारी कळंब यांच्या अहवालानुसार कला केंद्राच्या इमारतीचे बांधकाम परवानाबाबत कोणतेही कागदपत्र दिसून आलेले नाहीत. प्रत्यक्ष पाहणीत सदर ठिकाणी अंदाजे 50 आर क्षेत्रावर कला केंद्राचे बांधकाम दिसून आले. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग नाहीत. नियमानुसार रंगमंच उभारलेला नसून रंगमंचावर कोणतीही व्यवस्था दिसुन आली नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही.
10 वातानुकूलित खोल्या नृत्य सादरीकरणासाठी उपलब्ध ठेवल्या आहेत. यात खोलीत कला सादर करीत असल्याचे तिथल्या कलाकरानी सांगितले. छापील तिकीट, जीएसटी नाही. कलाकेंद्रातील कलाकार व इतर व्यक्तींची नावे, वय, पुर्ण पत्ते इ. बाबतची माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला दिली असल्याचे तोंडी सांगीतले मात्र कागदपत्रे दिली नाहीत. कार्यक्रमासाठी कोणतीही छापील तिकीटे दिली जात नाहीत. कला केंद्राच्या भिंतीला लागूनच बियर बार व हॉटेल लॉजिंग सुरु आहे.
ग्रामपंचायतीचे ठरावाचे अवलोकन केले असता सदरील ठराव हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव असून महाकाली सांस्कृतिक कला केंद्राबाबत ग्रामसभेमध्ये पारित झालेला ठराव सादर केला नसल्याचे दिसून येते. या ठरावासोबत मासिक सभेस उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या दिसून येत नाहीत, यासहा अन्य बाबी नमुद केल्या आहेत.
कला केंद्र सील व परवाना रद्द करण्याची पोलिस विभागाची शिफारस
सहायक पोलीस निरीक्षक येरमाळा यांनी 16 फेब्रुवारी 26 रोजी एक अहवाल दिला असुन त्यात त्यांनी हे कला केंद्र रिट याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत सील करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे. महाकाली कला केंद्रावर अनेक भांडण तक्रारी होऊन गुन्हे नोंद झाले असुन 6 गुन्ह्यांची यादी दिली आहे.भविष्यात भांडण तक्रारी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता यात वर्तवली आहे.
महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रास नाहरकत मिळणेबाबत अर्ज नामंजूर करुन निकाली काढण्यात आला असुन तसे कळविलेले आह, तरीही कला केंद्र व्यवसाय बेकायदेशीर सुरु असल्याचा ठपका ठेवला आहे.कला केंद्र तात्काळ स्थगित ठेवावे. कला केंद्र चालु ठेवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थाविषयक प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माळी यांच्यावर असेल असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.











