धाराशिव – समय सारथी
गेल्या वर्षभरात धाराशिव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरु ठेवणारा अट्टल सराईत आरोपी कृष्णा ऊर्फ पिंटू खडेल शिंदे (रा. मुरुड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पिंटू शिंदे सध्या वाटवडा शिवारात एका हॉटेलजवळ थांबलेला असल्याचे समजल्यावर पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा संशय आल्यावर आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत पिंटूने आपल्या इतर दोन साथीदारांसह धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि ग्रामीण परिसरात गेल्या वर्षभरात एकूण 15 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
चोरीस गेलेल्या मालाबाबत विचारणा केली असता, आरोपीने सांगितले की घरफोडीनंतर मिळालेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम याची वाटणी आम्ही आपापसात करत होतो. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 84 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 3 लाख 87 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात, अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि सुधीर कराळे, पो.ह. विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, योगेश कोळी, पोह. मनोज जगताप, महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांच्या पथकाने केली.