धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाची सुनावणी दरम्यान कोर्टाने डॉ पद्मसिंह पाटील यांना समन्स बजावणी प्रक्रियेवरून कडक शब्दात खडेबोल सुनावले. डॉ पद्मसिंह पाटील यांना 3 साक्षीदार तपासण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे, मागील तारखे वेळी कोर्टाने 3 साक्षीदार यांना कोर्टाने समन्स काढले मात्र ते पोलिसांना देणे अपेक्षित असताना आरोपीच्या वतीने खासगी व्यक्ती लहू घोलप व वसंत कसबे यांनी घेतले, त्या समन्सची बजावणी झाली नाही. सुनावणीसाठी उशीर करण्यासाठी हे करीत असल्याचे सरकारी वकील यांनी सांगत विरोध केला तर साक्षीदार यांचा पत्ता बदलल्याने समन्स बजावणी झाली नसल्याचे डॉ पाटील यांचे वकील महाडिक यांनी सांगितले. खासगी व्यक्तीला समन्स देणे धोकादायक असुन त्याने कोर्टाची प्रतिमा खराब होत असल्याचे मत व्यक्त करीत कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अखेर डॉ पाटील यांच्या वतीने वकिलांनी कोर्टात दिलगिरी व्यक्त केली. या खटल्याची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.
हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. डॉ पद्मसिंह पाटील वगळता सरकारी पक्षासह इतर सर्व आरोपीचे साक्षी, पुरावे पुर्ण झाले. दुहेरी खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे. 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. या हत्याकांड नंतर डॉ पाटील सक्रीय राजकारणापासुन लांब राहिले तर त्यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. कै पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर व जय राजे हे न्यायालयीन लढाई लढत आहेत.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला.
सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांनी 6 जुन 2009 रोजी (खुन घटनेनंतर 3 वर्षांनी) डॉ पाटील यांना खासदार पदावर असताना मुंबईतुन अटक झाली त्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते प्रफुल्ल पटेल व डी पी त्रिपाठी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना यात मुख्य आरोपी करीत 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. नात्याने चुलत भाऊ असलेल्या पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दुहेरी हत्याकांडात आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. हत्याकांडातील आरोपी पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे दोन्ही शुटर अजूनही जेलमध्ये असुन इतर सर्व आरोपी जामीनावर आहेत.