धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मुकुंद माधव कसबे या तरुणाच्या मृत्यु प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कसबे याला मारहाण झाल्याचा जबाब त्याने स्वतः वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नोंदवीला असल्याचे उपचाराच्या कागदपत्रावरून समोर आले आले, दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर त्याने मारहाण झाल्याचे डॉक्टरांना सांगितले त्यावरून डॉक्टरांनी तशी नोंद केसपेपर वर घेतली आहे. कसबे यांच्या उपचाराची काही कागदपत्रे तपास अधिकारी यांनी हेतुत गायब करीत ती तपास अहवालासोबत जोडली नाहीत मात्र ती कागदपत्रे रुग्णालयात असुन त्यावर कसबे हा स्वतः रुग्णालयात ऍडमिट झाल्याचे व त्याला मारहाण झाल्याचे नमुद आहे.
मारहाणीच्या घटनेला अकस्मात मृत्यू त्यानंतर 15 महिन्यानी अपघात दाखवून प्रकरण दडपले जात असुन यात तत्कालीन पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह अन्य काही जन गुंतले आहेत. या प्रकारात एक कर्मचारी ‘केंद्र’ स्थानी असुन मोठा आर्थिक व्यवहार करुन आरोपीना वाचवले जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरु असुन विशेष तपास पथक नेमण्याची मागणी होत आहे.
कसबे याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्याने मारहानीचा जबाब दिला असताना त्यादृष्टीने तपास न करता अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला व त्यात जमिनीवर पडून मृत्यू झाल्याचे दाखवले त्यासाठी काही बाबी लपवल्याचे समोर आले आहे. यातील काही साक्षीदार यांनी खोटा जबाब दिल्याचेही समोर आले आहे. अकस्मात मृत्यूच्या घटनेनंतर तब्बल 15 महिन्यांनी अपघात झाल्याचा साक्षात्कार झाला असुन अपघात झाल्याचे पाहिलेले साक्षीदार धनराज कांबळे हे रडारवर आहेत.
तपासात अनेक गंभीर त्रुटी दिसल्याने विशेष पोलिस महासंचालक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशाने ग्रामीण पोलिस ठाण्यातील या गुन्ह्याचा तपास आनंद नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आनंद नगर पोलिस ठाण्यातील अधिकारी याचा तपास करीत आहेत, मृत्यूच कोडं उलघडण्याचं पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे, आनंद नगर येथील अधिकारी इतर गुन्ह्यात व्यस्त असल्याने या घटनेचा तपास संथ गतीने सुरु आहे.
21 मार्च 2024 रोजी येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटर मुकुंद माधव कसबे (रा मोहा, ता कळंब) हा काम करीत होता. काम करीत असताना ढाब्यासमोर सिमेंट काँक्रेटवर पडून कानातुन रक्त आल्याने त्यास रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व 23 मार्चला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला अशी तक्रार राहुल बाळासाहेब देशमुख यांनी दिली त्यावरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची मयत क्रमांक 17/24 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली. त्यावेळी कोणावरही संशय तक्रार नसल्याचा जबाब देशमुख यांनी दिला.
देशमुख यांना घटनेच्या तब्बल 1 वर्ष 3 महिन्यांनी साक्षात्कार झाला व त्यांनी धाराशिव ग्रामीण पोलिसात 2 जुन 2025 रोजी फिर्याद दिली की, मला आज रोजी ढोकी येथील धनराज किसन कांबळे यांचेकडुन माहिती झाले की, मुकुंद कसबे हा ढाब्यासमोरील उड्डाण पुलाजवळ लातुर ते बार्शी रोडवर गेला असताना बार्शीकडुन येणारे एका मोटर सायकलने त्यास जोराची धडक दिली त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर तो पडलेल्या ठिकाणाहुन उठून ढाब्याकडे चालत आला व काँक्रेटच्या कोब्यावर पडल्याने कानातून रक्त आले. त्यावेळी मला तो काँक्रेटवर पडल्याने रक्त येऊ लागले असे वाटल्याने मी व लक्ष्मण जाधव त्यास दवाखान्यात घेऊन गेलो व उपचारानंतर त्याचा मृत्यु झाला म्हणुन भादवी कलम 304 अ, 279 व मोटार वाहन नियम 187 प्रमाणे 2 जुन 2025 ला गुन्हा नोंद केला.