धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असे आदेश धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काढले आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करा असे आदेश दिल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
तुळजाई कलाकेंद्रावर अनेक गैरप्रकार चालत असल्याचा व नियमाचे उल्लंघन केल्याचा अहवाल तहसीलदार व पोलिस विभागाने सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने कला केंद्र व तेथील गैरप्रकार व ग्रामस्थ महिलांच्या व्यथा समोर आणत पाठपुरावा केला आहे, अखेर त्याला यश आले आहे. इतर काही कला केंद्राच्या बाबतीत तक्रारी असुन त्यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे अहवालात?
वाशी तहसीलदार यांच्या अहवालानुसार तुळजाई कला केंद्रावर 44 महिला कलाकार व इतर 12 पुरुष असे कर्मचारी होते. परवान्याची प्रत दर्शनी भागावर लावणे आवश्यक असताना ते लावले नसल्याचे दिसून आले. सदर कला केंद्राची जमीन मालक सुशांत सुभाष उंदरे व निलेश हरिश्चंद्र जोगदंड यांनी विजया हिरामन अंधारे जामखेड अहिल्यानगर यांना 11 वर्षाच्या कराराने भाडेपट्ट्याने दिली आहे.
परवानगी मिळाल्यास कला केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. शासनाचे दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ कला केंद्र चालु ठेवणार नाही. कला केंद्रात मद्यविक्री व मद्यपुरवठा तसेच अवैध व्यवसाय इ. गोष्टी ठेवणार नाही. कला केंद्र परिसरात भविष्यात अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीच्या घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू देणार नाही असे हमीपत्र तहसिलदार यांना अंधारे यांनी दिले होते मात्र त्याचे वारंवार उल्लंघन केले.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली होती त्या आधारे परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
पालकमंत्री सरनाईक यांचे आदेश अन अंमलबजावणी –
लोक कला ही महाराष्ट्राची संस्कृती असुन त्याचा कोणी गैरवापर करत असेल तर त्याला बिलकुल माफी दिली जाणार नाही, ताबडतोब कारवाईचे आदेश पालकमंत्री यांनी दिले. लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजेत, ती जिवंत ठेवत असताना काही कला केंद्रावर कलेच्या नावावर हे काही सुरु आहे ते भयंकर आहे. कलेचा चुकीच्या पद्धतीने वापर, त्या व्यासपीठाचा वापर होत असेल तर ते चुकीचे आहे.
उपसरपंच बर्गे आत्महत्या व तुळजाई केंद्र संबंध –
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमसाला या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचा विषय ऐरणीवर आला होता. पुजा गायकवाड ही नर्तकी याच तुळजाई कला केंद्रात होती, तिथे त्या दोघांचे प्रेम बहरले व वाद टोकाला गेला. आत्महत्यापुर्वी बर्गे हे पुजाला भेटायला तुळजाई कला केंद्रावर आले होते त्यावेळी तिने भेटायला बर्गे यांना नकार दिला, वाद झाला आणि बर्गे यांनी तिथून पुजाच्या घरी आईकडे जाऊन सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सासुरे येथे डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी पुजा तुळजाई कला केंद्रात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.