धाराशिव – समय सारथी
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे 31 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ते भुम व परंडा येथे बैठका घेणार आहेत. मिशन कर्मयोगी अभियान अंतर्गत ही बैठक 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता परंडा येथे होणार असुन दुपारी 2 वाजता भुम येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीला महिला बचत गट, माविमचे सदस्य यासह इतर उपस्थितीत राहणार आहेत.
राजकीय नेत्याऐवजी सेवानिवृत्त अधिकारी प्रवीण परदेशी यांची सध्या भाजपकडुन चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांना फोनवर लोकसभा निवडणुकीच्या सर्वेच्या अनुषंगाने माहिती विचारण्यात आली. हे सर्वेक्षण एका खासगी कंपनीकडुन केले जात असुन परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग केले जात आहे. त्यातच परदेशी यांनी धाराशिव तालुका, त्यानंतर औसा व आता भुम परंडा येथे बैठका आयोजित केल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
परदेशी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.परदेशी यांना फडणवीस यांची नेहमीच पसंती असते, शिवाय परदेशी यांना चांगला प्रशासकीय अनुभव व दांडगा संपर्क आहे. परदेशी यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिल्याने त्यांचे धाराशिव लोकसभा मतदार संघातील तालुक्यात दौरे वाढल्याचे दिसते.
सर्वेक्षणात हे विचारले जातंय –
धाराशिव लोकसभा मतदार संघातील लातूर किल्लारी भूकंप झाला तेव्हा मदत व पुनर्वसन कार्य कोणत्या जिल्हाधिकारी यांनी केले हे आपणास माहिती आहे का? उत्तर न सांगितल्यास त्यांना प्रवीण परदेशी असे सांगा. परदेशी यांच्या कामाबद्दल काय वाटते. जर एखाद्या अधिकारी याला आपल्या धाराशिव मतदार संघात उमेदवारी मिळाली तर आपण त्यांचे समर्थन करणार का? तुम्हाला असं वाटत का अधिकारी अनुभवाच्या जोरावर चांगले काम करू शकतात.
धाराशिव लोकसभा मतदार संघात एक राजकीय नेता व एक सेवानिवृत्त अधिकारी यांच्यामध्ये निवड करायची झाल्यास कोणाची निवड कराल? एका अधिकाऱ्याची, नेत्यांना बऱ्याच संधी देऊन बघितल / राजकीय नेता किंवा अजुन ठरवलं नाही असे पर्याय दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्विनी वैष्णव, एस सुब्रह्मण्यम यासारख्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री केल्याचा दाखला देत या सर्वेतुन मन आणि मतपरिवर्तन केले जात आहे.
प्रवीण परदेशी यांची माहिती व कार्य –
63 वर्षीय प्रवीण परदेशी हे 1985 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी असुन सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. फडणवीस यांचे ते अत्यंत जवळीक व विश्वासू म्हणून ओळखले जातात, परदेशवारीत देखील ते नेहमी फडणवीसांच्या सोबत असत. मृदु भाषेने ते नेहमी सर्वांशी जवळीक साधून असतात.अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असुन मुख्य सचिव पदाने हुलकावणी दिल्याने ते केंद्रात जाऊन सेवानिवृत्त झाले. मित्रा उपक्रमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी 3 वर्षासाठी त्यांची नेमणूक केली आहे.
लातूर येथील 1993 मधील भूकंप काळात ते जिल्हाधिकारी होते, भूकंपातील पुनर्वसन व जागतिक बँकेकडून मिळालेली मदत यात त्यांचा मोठा वाटा आह. अर्थशास्त्र व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिकस येथे त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना व आर्थिक विकास या विषयात मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण, वित्त, शहर विकास, महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष सेवा केली आहे.भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.