धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील सेवन गटातील आरोपी विनोद गंगणे यांना धाराशिव येथील कोर्टाने पुढील सुनावणी पर्यंत तात्पुरता जामीन मंजुर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात 31 मे रोजी जामीन अर्जावर सुनावणी झाली असुन पुढील सुनावणी 6 जुन रोजी होणार आहे. गंगणे हे सेवन गटात असुन ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचे खबरी आहेत. गंगणे यांच्या विरोधात अनेक पुरावे असूनही केवळ त्यांनी टीप दिल्याने त्यांना पोलिसांचे अभय आहे. 6 जुनला कोर्टात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली असुन गंगणे यांना वाचवणार की तपासाचे ठोस मुद्दे, वस्तुस्थिती मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
गंगणे यांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या असुन त्यात गंगणे यांना 6 जुन पर्यंत रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत तपास अधिकारी यांच्या समोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. गंगणे यांनी या प्रकरणांशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कोणतेही प्रलोभन,धमकी किंवा आश्वासन देऊ नये. पुरावे, साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव अणू नये.या काळात अर्जदाराने कोणताही गुन्हा किंवा गुन्हेगारी कृत्य करू नये. कोर्टाच्या परवानगी शिवाय बाहेर जाऊ नये. या प्रकरणात सरकारी वकील व तपास अधिकारी यांनी त्यांचे म्हणणे 6 जुन रोजी किंवा त्या पुर्वी सादर करावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. 6 जुन रोजी होणाऱ्या सुनावणीस गंगणे यांना स्वतः कोर्टात हजर राहावे लागणार आहे. कोर्टाने अंतीम नियमित जामीन नाही दिला तर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे.