धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी 21 महिन्यात तब्बल 850 कोटींचा विक्रमी निधी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मंजुर केला आहे. नवा इतिहास, नवी सुरुवात असा नारा देत आरोग्यमंत्री सावंत यांनी राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सुविधासाठी अमुलाग्र निर्णय घेतला असुन भरीव विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधासाठी गेल्या 21 महिन्यात तब्बल 850 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असुन पालकमंत्री डॉ सावंत यांनी खंबीर साथ दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात आणखी विकास निधी व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी व्यक्त केला आहे.
डॉ तानाजीराव सावंत हे मंत्री झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात अनेक आरोग्य संस्था रुग्णालय, हॉस्पिटलला श्रेणीवर्धन, नवीन मंजुरी, इमारत दुरुस्ती, मशीन व इतर साहित्य आधुनिकीकरण रूपाने बळकटी मिळाली आहे. धाराशिव येथे नवीन 500 खाटाचे जिल्हा रुग्णालय, कॅथ लॅब, फिरता दवाखाना, मिशन आनंदी, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तालुक्यासह महाआरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत तसेच विविध शासकीय व नावीन्यपुर्ण योजनाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. या आरोग्य सुविधा व निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय सोय होणार आहे.
नुकतेच मंत्री सावंत यांच्या आदेशानुसार भुम येथे 60 बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन भुम तालुक्यातील अंद्रूड येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात खाटांची बेड संख्या 60 वरून 100 इतकी करण्यात आली आहे तर मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजुर करण्यात आले आहे.