15 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा संकल्प
पंढरपुर – समय सारथी
आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 जुलै 2024 दरम्यान “महाआरोग्य शिबीर” “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” पंढरपूर येथे 4 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. वारी काळात सुमारे 15 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पंढरपूर येथे आरोग्य विभागाची या महाआरोग्य शिबीर व महाराष्ट्र भरातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसंदर्भात, नियोजन व इतर तयारी संदर्भात पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सूचना दिल्या. सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्या ठिकाणी आरोग्य शिबीर होणार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
महाआरोग्य शिबिराचे हे दुसरे वर्ष असुन यासाठी पंढरपूरच्या 4 ठिकाणी भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार असून जवळपास 5000 डॉक्टरांच्या मदतीने सर्व वारकऱ्यांची सेवा, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी जवळपास 200 डॉक्टर डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार असून या माध्यमातून किमान पाच लाख वारकऱ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.
थंडी, ताप, खोकला, पोटदुखी आधी तत्सम आजारावरचे सर्व औषधे मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांना दिले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सहाशे दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना देखील महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, जवळपास शंभर तपासण्या करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. हे महाआरोग्य शिबीर राबवण्यासाठी सोलापूर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर या पाच जिल्ह्यातून सर्व आरोग्य यंत्रणाचे कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत.
आरोग्य तपासणीमध्ये काही वारकऱ्यांना जर आवश्यकता वाटली तर त्या वारकऱ्यांना मोफत शस्त्रक्रिया करून द्यायची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा पातळीवरील दर्जेदार रुग्णालयात मोफत करून देण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी स्पष्ट केले.