धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले त्यानंतर 5 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने 2 सप्टेंबर रोजीचा जो अद्यादेश काढला आहे तो वादाच्या भोवऱ्यात व कायदेशीर पेचप्रसंगात अडकला आहे. या अद्यादेशामध्ये ‘पात्र व्यक्ती’ ‘कुळ’ व ‘नातेसंबंध’ हे तीन शब्द वापरले आहेत, त्यात स्पष्ठता नसल्याने या निर्णयाचा फायदा मोजक्याच ‘पात्र’ अर्थात कुणबी नोंदी असलेल्या/सापडलेल्या लोकांना होणार आहे.
‘कुळ’ हे वडिलांकडील जातीचे आडनावाचे असते तर ‘नातेसंबंध’ हा शब्द अद्यादेशात वापरला असुन त्यात कोण कोण येते याचे स्पष्टीकरण नाही, कायद्याने जात प्रमाणपत्र देताना वडिलांकडील वारस (पितृसत्ताक) यांनाच ते दिले जाते, नातेसंबंध ग्राह्य धरत नाही. त्यामुळे ज्यांच्या कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या वारसांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, जे की पुर्वीपासूनच दिले जात आहे. ‘हैद्राबाद गॅझेट’ असे नाव वापरले असले तरी सर्वांना हे कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तर अगोदरपासुन मिळते मग 2 सप्टेंबरच्या अद्यादेशाने नवीन काहीच पदरात पडले नाही, असेच सत्य आहे.
शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, प्रतापराव सरनाईक,माणिकराव कोकाटे, उदय सामंत यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील उपस्थितीत होते, यांनी या आदेशाबाबत मराठा बांधवाना अधिक सुस्पष्टता देणे गरजेचे आहे. फसवणूक झाली तर ही तज्ज्ञ मंडळी तितकीच जबाबदारी व दोषी असतील अशी समाजाची भावना आहे.
सरकारने हैद्राबाद गॅझेट, पात्र व्यक्ती, कुळ, नातेसंबंध असे शब्द वापरून पुन्हा एकदा मराठा समाज व मनोज जरांगे यांची फसवणूक केली असे कायदेशीर जाणकार यांचे मत आहे. वाशी येथील अद्यादेशवेळी सुद्धा सगेसोयरे व पितृसत्ताक शब्द वापरले व फसवणूक केली तोच कित्ता पुन्हा सरकारने गिरवला गेला आहे. सरकारने फसवणूक केली तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे त्यामुळे ते व मराठा समाज आता काय भुमिका घेणार हे पाहावे लागेल.
ज्याच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील (वडिलांकडील) लोकांना या जीआरचा फायदा होईल परंतु ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना या 2 सप्टेंबर जीआरचा काहीही फायदा नाही . हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचार घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी विहित कार्यपध्दती असा आदेश काढला आहे.













