धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती आहे. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती असुन दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोण केला हे माहीत नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येत असुन त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता त्या दृष्टीने संशय व्यक्त केला जात आहे. एका आंदोलकाकडे बंदूक होती. पोलीस सुरक्षा असतानाही शस्त्रधारी आंदोलन पालकमंत्री यांच्याजवळ आला होता. उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व सावंत गटाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली होती त्यावेळी तेथे धनंजय सावंत हे उपस्थित होते.गोळीबाराला या वादाची किनार आहे का याचा पोलीस तपास सुरू आहे.