धाराशिव – समय सारथी
1 कोटी रुपयांच्या सीएसआर निधीचे आमिष दाखवून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका प्राध्यापकाला 9 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्राध्यापकाला त्याच्या संस्थेला 1 कोटी रुपयांचा निधी देतो मात्र त्यासाठी 9 टक्के प्रमाणे 9 लाख रुपये आधी द्यावे लागतील असे सांगण्यात आले. 9 लाख रुपये दिल्यावर 1 कोटी रुपयांचा निधी हा दिला जाईल असे आरोपीकडुन सांगण्यात आले. 9 लाख घेतल्यावर त्याला एक बॅग देण्यात आली त्यात खेळण्यातील नोटा होत्या. मार्च एंड आहे, त्यापूर्वी हा सीएसआर निधी खर्च करायचा आहे, आमच्याकडे करोडो निधी आहे, कमिशन द्या, निधी घ्या असे म्हणत फसवणूक करणारी मोठी टोळी असुन त्यांनी अनेकांना आजवर फसवले आहे, त्यामुळे याचा तपास होणे गरजेचे आहे.
प्राध्यापकाला 1 कोटीचे आमिष दाखवण्यात आले त्याला तो भुलला, त्याने 9 लाख रोख कॅश देण्याचे मान्य केले व आरोपीनी त्याला पैसे घेऊन लातुर जिल्ह्यातील मुरुड येथे येण्यास सांगितले. त्यानुसार हा प्राध्यापक तिथे गेला, दोघांची भेट झाल्यावर त्याला एका गाडीत बसवून नेण्यात आले व तिथे 9 लाख घातल्यावर एका बॅगेत 1 कोटी असल्याचे सांगत ती बॅग देण्यात आली, कोणीतरी पाहील इथे उघडू नका असे म्हणुन त्याला जायला सांगितले त्यानंतर प्राध्यापकाने आपला फायदा झाला असे म्हणत बॅग उघडली तेव्हा त्याने डोक्याला हात लावला, त्या बॅगेत चक्क लहान मुलांच्या खेळण्यातील डुप्लिकेट नोटा होत्या. 9 लाख तर गेलेच पण हाती फक्त रद्दी आली. या नंतर हा प्राध्यापक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करायला गेला मात्र तिथे काही जणांनी संगितले की यात तुम्ही पण अडकता, आरोपी होता, प्रतिष्ठा जाईल बदनामी होईल .. मग काय हा प्राध्यापक पायाला भिंगरी बांधून तिथून सुसाट तुळजापूरला आला आहे. फसवणूक करणारी टोळी व प्राध्यापक जिथे भेटले त्या ठिकाणी गाडी व इतर बाबी सीसीटीव्हीमध्ये कैद आहेत, प्राध्यापकाने मुरुड पोलिसाना सगळी माहिती दिली आहे, त्याचा तपास सुरु आहे.
सीएसआर निधी हा सामाजिक संस्था व इतरांना सामाजिक कामे करण्यासाठी विविध कंपनीच्या मार्फत दिला जातो, हा निधी कधीही रोख स्वरूपात दिला जात नाही, तो संबंधित संस्थेच्या बँक खात्यावर दिला जातो. त्यापूर्वी त्या संस्थेचे कार्य, आर्थिज स्तिथी व ज्यासाठी निधी वापरला जाणार आहे त्या प्रकल्प अहवाल घेतला जातो. सीएसआर हा कंपन्यांनी समाजकल्याणासाठी खर्च करावयाचा निधी आहे. भारतातील कंपन्या अधिनियम, 2013 अंतर्गत कलम 135 नुसार काही विशिष्ट कंपन्यांना ( 5 कोटी पेक्षा निव्वळ नफा, 500 कोटी पेक्षा अधिक मालमत्ता, 1 हजार कोटी पेक्षा अधिक वार्षिक उलाढाल ) त्यांच्या निव्वळ नफ्याचा एक निश्चित टक्का सामाजिक कार्यांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पात्र कंपन्यांनी त्यांच्या मागील तीन आर्थिक वर्षांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2 % सीएसआर उपक्रमांवर खर्च करणे आवश्यक असते. मोठ्या कंपन्याची नावे सांगून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे.