विधानसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप, 3 जणांना नोटीस, 8 आठवड्यानंतर सुनावणी होणार
धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी मंत्री तथा भुम परंडा मतदार संघांचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीत सावंत यांनी साडी, भांडी व बचत गटांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला असुन भैरवनाथ साखर करखान्याचे चेअरमन तथा डॉ सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांना, क्रांती महिला उद्योग समुहाच्या अर्चना दराडे व निवडणुक निर्णय अधिकारी अश्या 3 जणांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढण्यात आली असुन पुढील सुनावणी 8 आठवड्यानी होणार आहे. सावंत यांनी महिला उद्योग समुहाच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज दिले आहे, मुळात या संस्थेला कर्ज देण्याचा अधिकार किंवा परवाना नाही असे असतानाही 5 ते 7 कोटी रुपये दिल्याचा आरोपी याचिकेत केला आहे. बचत गटांना चेकद्वारे कर्ज दिले असुन तसे पुरावे सोबत जोडले आहेत. तसेच क्रांती समुहाच्या खात्यावर रक्कम अचानक आली असे आक्षेप आहेत. आमदारकीची हॅट्रिक केलेल्या राहुल मोटे यांचा आमदार सावंत यांनी 2019 व 2024 असा सलग 2 वेळेस पराभव केला आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ तानाजीराव सावंत यांचा 1 हजार 509 मतांनी विजय झाला होता. शिवसेना महायुतीचे डॉ सावंत यांना 1 लाख 3 हजार 254 तर राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे राहुल मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 इतकी मते पडली होती. 2019 च्या निवडणुकीत डॉ तानाजीराव सावंत यांनी तत्कालीन विद्यमान आमदार राहुल मोटे यांचा पराभव केला होता, सावंत हे 32 हजार 902 इतक्या मतांनी विजयी झाले होते. सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 इतकी तर मोटे यांना 73 हजार 772 इतकी मते पडली होती, वंचित आघाडीचे सुरेश भाऊ कांबळे यांना 27 हजार 939 मते पडली होती. त्यानंतर सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री झाले होते मात्र 2024 ला त्यांना मंत्रीमंडळातून बाजूला ठेवण्यात आले. 2004 ला बाळासाहेब पाटील हडोंग्रीकर विरोधात 11 हजार 491 मतांनी विजयी , 2009 ला शंकर बोरकर विरोधात 6 हजार 2 , 2014 ला ज्ञानेश्वर पाटील विरोधात 12 हजार 389 मतांनी विजयी, असे सलग 3 टर्म राहुल मोटे विजयी होऊन त्यांनी हॅट्रिक केली होते.