धाराशिव – समय सारथी
भुम येथील बाजारपेठेत सध्या बनावट नोटांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. आठवडी बाजार व गर्दीचा फायदा घेऊन या नोटा दिल्या जात असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता आहे. भूम आठवडी बाजारपेठेमध्ये हुबेहुब दिसणारी पाचशे रुपयांची बनावट नोट वस्तूच्या मोबदल्यात देणारे काही सराईत गुन्हेगार सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. भूम शहरांमध्ये व्यापाऱ्यांना या नोटा देऊन वस्तु खरेदी करुन चुना लावण्यात आला आहे, त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
भुम शहरातील वारे क्लोथिंग सेंटर या कपड्याच्या दुकानांमध्ये काही सराईत गुन्हेगारांनी पाचशेची बनावट नोट देऊन कपड्याची खरेदी केली. गर्दी असल्याने दुकान मालक यांच्या आईला गडबडीत ही बाब लक्षात आली नाही. काही काळानंतर व्यापारी वारे यांना लक्षात आले की ही पाचशेची नोट बनावट आहे परंतु तोपर्यंत देणारा सराईत गुन्हेगार मात्र पुढे निघून गेला होता.
भूम शहरातील साई गोळी सेंटरचे मालक अमोल रोकडे व अंकुश किराणा स्टोअर्सचे मालक अंकुश क्षीरसागर यांची देखील त्याच दिवशी अश्याच प्रकारे फसवणूक झाली असल्याचे दिसून आले. एकंदरीतच शहरातील विविध दुकानात या बनावट नोटा गुन्हेगारांनी खपवून पळ काढला आहे. या नोटांची मालिका ही 5AE 404284 अशा प्रकारची आहे.
व्यापारी, नागरिकांना यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात आले आहे.भुमसारखे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. बनावट 500 रुपयांच्या 3 ते 4 नोटा ते एका ठिकाणी खपवतात त्यामुळे काही व्यापारी पोलिसात तक्रार द्यायला धजावत नाहीत मात्र आठवडी बाजारात असे अनेक प्रकार घडत आहेत. या नोटा पाहता जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.