परंडा येथे गुन्हा रद्दची ‘नामुष्की’ तर तुळजापूर तस्करीतील 21 ‘फरार’ आरोपी
धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत, त्यांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी,आखणी सुरु आहे.फडणवीस यांचा हा दौरा तुळजापूर येथील ड्रग्ज मुक्ती करुन नवीन सुरुवात करणारा ठरू शकतो. तुळजापूर व परंडा ड्रग्ज तस्करी यासह अन्य मुद्यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. परंडा येथे पकडलेले ड्रग्ज हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचे समोर आले असल्याने गुन्हा रद्द करण्याचा प्रस्ताव देण्याची नामुष्की ओढवली आहे तर तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाईंड असलेला ‘आका’ व ‘बोका’ कोण हे समोर आले नसुन 35 पैकी 21 आरोपी फरार आहेत. यात 4 आरोपी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी पर्यायाने भाजपशी निगडीत आहेत, मुख्यमंत्री ड्रग्ज स्वच्छता मोहीम राबवणार का ?

तुळजापूर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडले असुन पोलिसांनी अद्याप मकोका व संपत्ती जप्तीची कारवाई सुरु केलेली नाही. फडणवीस यांनी कारवाईच्या कडक सुचना दिल्या असुन कोणालाही सोडू नये असे आदेश दिले आहेत. तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करी, सेवन व व्यसन हा गंभीर सामाजिक मुद्दा बनला असुन तुळजापूर येथील नागरिक, व्यापारी, पुजारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटणार आहे व ड्रग्जचे वास्तव त्यांच्याकडे मांडणार आहे. मुख्यमंत्री येण्यापुर्वी फरार 21 आरोपी पैकी किती जणांना अटक केली जाते व आणखी किती नवीन आरोपी निष्पन्न होतात हे पाहावे लागेल.
तुळजापुर येथे मुंबईवरून ड्रग्ज विक्री करणारी तस्कर महिला संगीता गोळे हिला व तिचा साथीदार संतोष खोत याला अटक केली असुन पती वैभव गोळे फरार आहे. संगीता हिच्या एका बँक खात्यावर 5 कोटी व घरात पाव किलो सोने सापडल्याने गोळे परिवार तस्करीत असुन ते कोणाकडुन ड्रग्ज खरेदी करीत होते, त्यात कोणाचा पैसा गुंतला होता, गोळेच्या वरची मुंबईतील चैन तपासात समोर आलेली नाही.
परंडा शहरात 19 जानेवारी 2024 मध्ये झालेल्या ड्रग्ज विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले 8.33 ग्रॅम हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गुन्ह्याची फिर्याद गैरसमजुतीतुन दिल्याने गुन्हा रद्द करावा यासाठी ‘क’ समरी कोर्टात मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे 2 तरुणांना आरोपी बनवण्यात आले. इम्रान नसिर शेख व अन्वर उर्फ अण्णा अत्तार या 2 आरोपीना अटक केली त्यातील इम्रानने पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज असल्याचे मान्य केले तर अण्णा अत्तारने ड्रग्ज इम्रानकडुन सेवनासाठी घेतल्याचे कबुल केले मात्र प्रयोगशाळेत ते कॅल्शियम क्लोराईड सापडले.
तत्कालीन सपोनि कविता मुसळे यांनी गस्ती करीता रवाना होणेपुर्वी पोकॉ मुलाणी यांना लॅपटॉप, प्रिंटरचे साहित्य, पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेणेबाबत सुचना केल्या, त्याप्रमाणे साहित्य घेऊन स्टेशन डायरीला नोंद करुन पेट्रोलिंगला गेल्या, जसे की त्यांना ड्रग्ज 100 टक्के सापडणार होते हे आधीच माहिती होते. अमली पदार्थ ओळखण्यासाठी फील्ड ड्रग्ज टेस्ट किट ही पोलिसांकडे असने व त्याचा वापर करणे अपेक्षित होते मात्र ती न करता थेट ड्रग्ज आहे म्हणुन का गुन्हा नोंद केला. आरोपीचा कॅल्शियम क्लोराईड पावडर जवळ ठेवण्याचा हेतू काय ? संवेदनशील प्रकरणात ड्रग्ज नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी एका होमगार्डकडे देणे, 7 महिन्याच्या अंतराने तपासाअंती अटक केली, त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन करण्याची कबुली दिली असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.
पोलीस अधीक्षक जाधव यांचा ड्रग्ज मुक्तीचा ‘विडा’
धाराशिव जिल्ह्यातुन ड्रग्ज मुक्तीचा ‘विडा’उचललेल्या पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असुन फिर्यादीला समन्स काढण्यात आले आहे. 2 तरुण काही जणांच्या चुकीचा ‘बळी’ ठरले की अन्य काही झाले याची चौकशी होणे गरजेचे आहे. एसपी जाधव व त्यांच्या टीममुळे धाराशिव जिल्ह्यात प्रथमच ड्रग्ज तस्करी कागदावर आली व गुन्हा नोंद होऊन 35 जन आरोपी असलेले रॅकेट उघड झाले, त्याची व्याप्ती अजुन वाढतच आहे.