ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 3 वेळेस पोलिस कोर्टात तोंडघशी
मी नाही त्यातला, एकपात्री नाटक – बहुरूपी भुमिका
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांवर टोकाचा राजकीय दबाव असुन पोलीस एका नेतृत्वाचे हातचे बाहुले बनले आहे असेच दिसते. ड्रग्ज तस्करी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कोर्टाने पोलिसांना चांगलेच धारेवर धरत झापले आहे.
पोलिसांवर टोकाचा राजकीय दबाव असुन ते एका नेतृत्वाचे हातचे ‘बाहुले’ बनले आहे. एकाच दगडात 2 पक्षी (दोन्ही बाजुचे) मारण्यात ‘हातकंडा’ असलेले नेतृत्व निवडणुकीत केलेल्या राजकीय विरोध व उपद्रव मुल्याचा ‘हिशोब’ चुकते करीत असल्याचे बोलले जात आहेत. माझा काय संबंध? मी नाही त्यातला? एकपात्री नाटक,ज्यात कलाकार एक,भुमिका अनेक असे पात्र सुरु आहे. यात एखाद्या पोलिस अधिकारी याचा कारवाईत बळी जाऊ नये, म्हणजे झाले.
आले पोलिसांच्या मनात… असेच काहीसे झाले आहे. ज्या आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे होते त्यांना ‘अभय’ देणे व ज्याच्या विरोधात पर्याप्त पुरावे नसताना गुन्ह्यात आरोपी करणे असाच प्रकार झाल्याचे कागदपत्रे, कोर्टाचे निरीक्षण व आदेशावरून स्पष्ट होत आहे. नेतृत्व कृपेने ज्यांना क्लीन चीट /अभय मिळत आहे ते त्यांचे ‘उपकार’ व ‘आभार’ मानत आहेत.
तेरणा उपचार कागदपत्रे दोषारोप पत्रात नाहीत
विनोद गंगणे यांचे बंधु विजय गंगणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुंबई, पुणे येथील परिवारात फिरत असताना चूक झाली व नकळत विनोद गंगणे यांना व्यसन लागले, त्यानंतर आम्ही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे गेलो व त्यांनी सांगितले की, उपचार घ्या, आम्ही सोलापूर येथे जाऊन उपचार घेतले, त्यानंतर राणा दादा यांनी तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ येथे पाठवले. तिथे तज्ज्ञ डॉक्टर यांनी सांगितले की पिटू भय्या यांना बडोदा किंवा पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा असे सांगितले, त्यानंतर आम्ही पुणे येथे गेलो मात्र ते आम्हाला आवडले नाही, नंतर बडोदा येथे गेलो. दोषारोप पत्रात तपासात तेरणा येथील उपचार कागदपत्रे जोडली नाहीत. तेरणा अनुषंगाने तपास केलेला दिसत नाही, तेरणा येथे अधिकृत व्यसनमुक्ती केंद्र होते का? जर नसेल तर तेथील तज्ज्ञ डॉक्टर यांनी रुग्णाची माहिती पोलिसांना दिली का? असे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.