धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत सेवन गटातील फरार आरोपी विनोद गंगणे यांना पुढील सुनावणी पर्यंत अंतरीम जामीन मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी पुढील सुनावणी पर्यंत तात्पुरता जामीन अर्ज मंजुर केला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात हा पहिला तात्पुरता जामीन असुन त्यामुळे गंगणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंतीम सुनावणी वेळी गंगणे यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे अशी अट कोर्टाने घातली आहे.
पुणे येथील ऍड व्ही व्ही दुशिंग व ऍड अंगद पवार यांनी बाजु मांडली त्यानंतर जामीन मंजुर करण्यात आला. ड्रग्ज तस्करीत गंगणे यांनी पोलिसांना खबर दिली त्यामुळे त्यांना हे उघड करायचे होते, त्याचा हेतू चांगला होता अशी बाजु वकिलांनी कोर्टात मांडली. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात गंगणे हे पोलिसांचा खबरी असुन त्यांनी दिलेल्या टीप नंतर तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाला.
धाराशिव पोलिसांनी तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी कारवाई करीत 3 जणांना ड्रग्जसह रंगेहात अटक केली. 25 मार्च रोजी पोलिसांनी 20 नंबर आरोपी म्हणुन विनोद उर्फ पिटू विलास गंगणे यांना आरोपी केले तेव्हापासुन ते फरार होते. गंगणे 13 मे रोजी कोर्टात आत्मसमर्पणसाठी आले होते मात्र कोर्टात दिलासा मिळणार नसल्याचे लक्षात येताच फरार झाले होते.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 37 आरोपीपैकी 27 आरोपी तस्कर गटात तर 10 आरोपी सेवन गटात आहेत त्यातील 17 तस्कर व 2 सेवन गटातील असे 19 आरोपी अटकेत आहेत तर 17 आरोपी फरार आहेत, एकाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 7 आरोपी फरार आहेत.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.ड्रग्ज प्रकरणात आजवर कोर्टाने 14 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले असुन त्यात 6 आरोपी फरार आहेत तर 8 आरोपी हे धाराशिव येथील जेलमध्ये आहेत, 5 आरोपींचे जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत. ड्रग्ज प्रकरणात आजवर कोर्टाने 14 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले असुन त्यात 6 आरोपी फरार आहेत तर 8 आरोपी हे धाराशिव येथील जेलमध्ये आहेत, 5 आरोपींचे जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत.