धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीतील फरार आरोपी विनोद गंगणे हा गेल्या काही दिवसापुर्वी धाराशिव न्यायालयात ‘आत्मसमर्पण’ (सरेंडर) करण्यासाठी आल्याची माहिती आहे. महिनाभरापासुन पोलिसांना सापडत नसलेला गंगणे त्याच्या लवाजाम्या थेट कोर्टात आला, तिथे कायदेशीर बाबींची ‘चाचपणी’ केल्यानंतर कोर्टात दिलासा मिळणार नसल्याचे लक्षात येताच तो ‘सन्मानाने’ गाठीभेटी घेऊन निघुन गेला. गंगणे हा बराच वेळ कोर्टात थांबून होता त्यानंतर तो अंदाज घेऊन निसटला. दरम्यानच्या काळात कोर्ट परिसरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या वेगळ्याच.. गंगणे याला पोलिसांनी मटक्याच्या गुन्ह्यात मटका बुकी म्हणुन आरोपी केले आहे, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यात स्वतः लक्ष घातले आहे.
न्यायव्यवस्थेत व विधीज्ञ मंडळीत हा विषय चर्चेचा बनला आहे तर दुसरीकडे गंगणे याचे समर्थक भाईच्या हिमतीला तोड नाही असे ‘गोडवे’ गात घटनाक्रमाच्या सुरस ‘कथा’ सांगत आहेत. गंगणेचे राजकीय ‘लाड’ करणारा ‘लाडोबा’ कोण ? हा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. ड्रग्जसह अन्य बाबीत पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे मात्र ‘लुडबुड’ गँगचा अडथळा येत आहे. ड्रग्ज, मटका व इतर अवैध धंद्यातुन कामावलेली संपत्ती जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु करणे गरजेचे आहे. पोलिसांनी 17 हजार पानाच्या आसपास कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत, त्यानंतरही तपास सुरु आहे.
ड्रग्ज गुन्ह्यात पोलिसांनी 36 पैकी 26 आरोपी तस्कर गटात तर 10 आरोपी सेवन गटात असल्याचे वर्गीकरण केले आहे, अटक आरोपी व उपलब्ध कागदपत्रे आधारे प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी वर्गीकरण केले आहे. सेवन गटातील आरोपी माजी उपसभापती शरद जमदाडे व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांचा भाचा आबासाहेब पवार या 2 जणांना अटक केली असुन 23 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. सेवन गटाला दिलासा कोर्टात अपेक्षित मिळाला नाही, त्यामुळे खळबळ उडाली आहे. 36 पैकी 15 तस्कर व 2 सेवन गटातील असे 17 आरोपी अटक असुन 19 आरोपी फरार आहेत. तस्कर गटातील 26 पैकी 11 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत.
Cold Blooded व सराईत गुन्हेगारी पद्धत –
विनोद उर्फ पिटू भाई गंगणे याने 25 ऑगस्ट 2024 रोजी एकाच दिवशी तब्बल 1 लाख 85 हजार रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले. ड्रग्ज खरेदी करण्यापुर्वी त्याने मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत याच्याशी थेट संपर्क साधला. त्यानंतर गंगणे यांनी 4 जणांच्या फोन पे वरून 1 लाख 85 हजार त्याचं दिवशी ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर ट्रान्सफर केले. मोबाईल संभाषण, फोन पे, पिडीत असलेले साक्षीदार याचे जबाब पोलिसांनी घेतले असुन ते कोर्टात चार्जशीटसोबत सादर केले आहेत. गंगणे याने शांत डोक्याने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून ड्रग्ज आणले, हे कृत्य गंभीर व सराईत आरोपीसारखे आहे, असे असतानाही गंगणे हे सेवन गटातील आरोपी आहेत.