धाराशिव – समय सारथी
आज मन अतिशय अस्वस्थ आहे. कै. अजित पवार यांच्या निधनाच्या दुर्दैवी बातमीने अंतर्मन व्यथित झाल आहे. मेहुणे म्हणून आमचे नाते केवळ कौटुंबिक नव्हतं, तर विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदराचे होते असे म्हणत राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्रिमंडळात एकत्र काम करताना त्यांच्या कार्यक्षमतेचा, ठाम निर्णय क्षमतेचा आणि राज्यासाठीच्या तळमळीचा अनुभव मी स्वतः अनेकदा प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांचे मेहुणे व माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव तालुक्यातील तेर हे गाव आहे. तेर येथील बाजीराव पाटील यांचे अजित पवार हे सगळ्यात धाकटे जावाई होते. डॉ पद्मसिंह पाटील यांना जिजाबाई, तानाबाई, द्रोपदीबाई या तीन आई होत्या. जिजाबाईचे डॉ पद्मसिंह पाटील, पुष्पाताई पाटोदेकर, सुनंदा व अजित बाबा पाटील तर दुसऱ्या आईचे सुशिला राऊत, सिंधूताई मोटे, उतरा टोणगे, उषाताई गोरे, सुचिता गोरे तर तिसरी आई द्रोपतीबाई यांचे सुवर्णा खानवीलकर, सुलभा कदम आणि सुनेत्राताई पवार व अमरसिंह पाटील या प्रमाणे मोठ्या परिवारातील अजित दादा हे जावाई होते. डॉ पाटील हे कुटुंबकर्ते आहेत, सगळ्या बहीण भावंडांची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती, ते आजही सगळी कर्तव्य पार पडतात.
बारा वाड्या व तेरावे तेर या गावचे बाजीराव पाटील यांच्याकडे पाटीलकी होती. डॉ पद्मसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. डॉ पद्मसिंह पाटील जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना सुनेत्रा पवार या धाराशिवमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या.
डॉ पद्मसिंह पाटील यांचा राजकीय आलेख वाढत असतानाच आमदार, एस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री, गृहमंत्री म्हणून काम करताना डॉ पाटील हे शरद पवार यांचे अंत्यत विश्वासू व कट्टर समर्थक बनले. त्या दरम्यानच सुनेत्रा पवार व अजित पवार यांचा विवाह ठरला होता. त्यामुळे डॉ पद्मसिंह पाटील व शरद पवार यांचे पारिवारीक जवळचे संबंध निर्माण झाले होते. अजित पवार यांच्या दुःख निधनामुळे तेरसह धाराशिव जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता.












