धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीला खासदार, आमदार, निमंत्रित सदस्यासह शासकीय अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. 408 कोटीपैकी 143 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 265 कोटी रुपयांचा निधी शिल्लक असुन त्याच्या कामाला व आगामी आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन या बैठकीत होणार आहे, त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे.
सरनाईक हे जुन्या कामांना मान्यता देतात की नवीन कामे सुचवतात याकडे लक्ष लागले आहे.धाराशिव, परंडा, तुळजापूर विधानसभा आमदार तेचं राहिले असुन उमरगा येथे बदल झाल्याने तेथील कामांची यादी बदलू शकते. विधानसभा मतदार संघात समसमान व निकषाप्रमाणे निधीवाटप, जुनी नवीन कामांची यादी यामुळे बैठक वादळी ठरणार आहे. जवळपास 7 कोटी रुपयांचा निधी नावीन्यपुर्ण योजनासाठी शिल्लक असुन यावर काही राजकीय नेते व दलालांचा डोळा आहे. नावीन्यपुर्ण निधी एक प्रकारची मलाई असल्याने यावर अनेकांचा डोळा आहे. दिवाकर रावते, अर्जुनराव खोतकर, शंकरराव गडाख यासह अन्य काळात बाहेरचे पालकमंत्री काही चुकीच्या प्रवृत्ती व दलालाच्या टोळीमुळे टक्केवारीच्या टिकेचे धनी ठरले होते, काही जणांना तर गोळा केलेली टक्केवारी परत करावी लागली. दलाल व टक्केवारीचे जाळे हे मोठे आव्हान सरनाईक याच्यासमोर असणार आहे. बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री असल्याची संधी साधत काही जणांनी तर ठाणे वारी करीत फिल्डिंग लावत आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.