धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या संकल्पनेतुन व पुढाकारातून जिल्हा परिषदेची वेबसाईट तयार करण्यात आली असुन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सर्व सुविधानी युक्त असलेली वेबसाईट तयार करण्यात आली असुन त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. एका क्लिकवर नागरिकांना विविध शासकीय योजना, माहिती तसेच त्यांना त्या योजनेसाठी लागणारे अर्ज देखील भरता येणार आहेत त्यामुळे नागरिकांना घर बसल्या योजनेचे अर्ज, त्या अर्जाचा टप्पा कळणार आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषद किंवा संबंधित विभाग याच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही, यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे. वेबसाईट सोबतच जिल्हा परिषदेच्या सभागृहाचेही उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
नागरी सुविधा हा वेबसाईटमध्ये स्वतंत्र विभाग असणार असुन त्यात सर्व प्रकारचे अर्ज, नमुने, लाभार्थी निकष, माहिती असणार आहे.विविध विभागाची माहिती, अधिकारी यांचे नावे, नंबर, कार्यपद्धती यांची माहिती ऑनलाईन मिळणार आहे. कृषी, अर्थ व बांधकाम,समाज कल्याण, पंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, महिला व बालविकास, पाटबंधारे यासह अन्य विभागाची माहिती यात असणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीचे उपक्रमही यात असणार आहेत. माहितीचा अधिकार अंतर्गत इथे विभागाची माहिती दिली जाणार असुन मीडिया कॉर्नर, धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन, जिल्हा परिषदेचा स्थापनेपासूनचा इतिहास याची माहिती देखील असेल. भरती, निविदा, घोषणा यासाठी स्वतंत्र फोल्डर केले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेची ही वेबसाईट लोकोपयोगी असणार आहे.