धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबविण्याचा निर्धार अध्यक्षा अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला असुन पारदर्शक व विकासाभिमुख कारभारावर भर देणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष झाल्यावर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी विकासाच्या विविध संकल्पना मांडल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालकेसह अधिकारी पदाधिकारी उपस्थितीत होते.
महिला सक्षमीकरणासाठी उमेद भवनसह जननी आरोग्य योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगून त्यांनी आशा कार्यकर्त्यांना दुचाकी वाहन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. नावीन्यपुर्ण योजने अंतर्गत थेट आशा कार्यकर्ते यांच्या बँक खात्यावर देण्यात येईल जेणेकरून या योजनेत पारदर्शकता राहील.
अंगणवाडी शालेय पोषण आहार वाटपावर भर देण्यात येणार असुन यासाठी जिल्हा परिषद स्वतः मेन्यू ठरवेल व त्यासाठी अन्नाच्या गुणवत्तेवर भर देण्यात येईल. सेमी इंग्रजी सुरु करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असुन तसे ठराव घेऊन लवकरच जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्याचे संकेत दिले. संत गोरोबा काका यांच्यासह इतर संतांच्या साहित्य यावर आधारित चल प्रदर्शन करण्यात येणार असुन समृध्द ग्रामपंचायत, शाळा एकत्रीकरण आदीची माहिती दिली.
जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचे निश्चित झाले आहे, त्यासाठी लवकरच एक प्लॅन तयार करण्याचे काम सुरु आहे. सर्व निवासस्थाने जिल्हा परिषदच्या आवारात होतील, त्यामुळे सुसुत्रता येईल. धाराशिव पंचायत समिती इमारत, उमेद इमारत आदी इमारतींची कामे लवकरच सुरू होतील. जिल्हा परिषदेच्या जागेवर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत ते अतिक्रमण काढण्यात येवून, जिल्हा परिषदच्या नावे 8 अ मालकी हक्क प्रमाणपत्र तयार करण्याचे काम हाती घेतले असुन येत्या महिन्यात मालमत्ता माहिती एकत्रीत केली जाईल असेही अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.












