धाराशिव – समय सारथी
धाराशिव विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना 60 हजार 423 मतांची आघाडी मिळाली असुन धाराशिव कळंब मतदार संघात ओमराजे व आमदार कैलास पाटील या जोडीचा ओके पॅटर्न यशस्वी ठरला आहे, या पॅटर्नचा डंका आता जिल्ह्याभर गाजला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना 76 हजार 735 तर ओमराजे यांना विक्रमी 1 लाख 37 हजार 158 इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 8 हजार 628 इतकी मते मिळाली आहेत.
धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र या दोघांनी मायक्रो प्लॅनिंग करुन विजयश्री खेचून आणला. ओमराजे यांच्या सोबत कैलास पाटील हे एकमेव आमदार सोबत होते. शिवसेना फुटीच्यावेळी आमदार कैलास पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले आहेत, हीच त्यांची जमेची बाजु आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 13 हजार 467 मतांनी कैलास पाटील विजयी झाले होते आता 2024 च्या लोकसभेत धाराशिव विधानसभेत 60 हजार 423 मतांची आघाडी मिळाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 8 हजार 412 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 3 हजार 179 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 94 हजार 767 मते मिळाली होती मात्र 2024 च्या लोकसभेत ओमराजे यांना तब्बल 60 हजार 423 मतांची आघाडी मिळाली. गद्दार विरुद्ध खुद्दार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत राहिली.
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात 63.93 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 65 हजार 951 पैकी 2 लाख 34 हजार 212 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव कळंब मतदार संघात मतमोजणीच्या 30 फेऱ्या/राऊंड झाले.