नशामुक्त भारत संकल्प, संस्कारमय पिढी घडवणार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल
धाराशिव – समय सारथी
कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण व राष्ट्रभक्ती यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असुन या पंचसूत्रीतुन समाज परिवर्तन करण्यावर भर आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक भाव वाढणे गरजेचे आहे. नशामुक्त भारत संकल्प असुन संस्कारमय पिढी घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी “प्रमुख नागरिक संगोष्ठी” (परिसंवाद) कार्यक्रम संपन्न झाला, यात डॉ कृष्णगोपालजी यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा संघचालक ऍड रवींद्र हरिदास कदम, लातुर संघचालक संजय अग्रवाल उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह अजय जानराव यांनी केले. ऍड सचिन सुर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यशवंत सुर्यवंशी यांनी व्यक्तीक गीत सादर केले. सुत्रसंचलन विश्वास कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन ऍड मल्लिकार्जुन आपचे यांनी मानले.
कृष्णगोपालजी हे मथुरा येथील रहिवासी असुन प्राथमिक ते उच्च स्तर संघ शिक्षण वर्ग केले आहे. 1965 पासुन ते स्वयंसेवक आहेत, 1980 पासुन ते प्रचारक असुन 2012 पासुन सह सरकार्यवाह ही जबाबदारी पार पाडत आहेत.
संघाच्या 90 हजार शाखा रोज होत असुन 40 हजार साप्ताहिक व मासिक शाखा अश्या 1 लाख 30 हजार ठिकाणी संघ स्वयंसेवक एकत्र येतात व मातृभूमीची प्रार्थना करतात. संघांचे कार्य गेली 100 वर्षापासुन निरंतर चालत असुन ते दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू समाजाने संघ कार्य समजुन घेतले पाहिजे, हे कार्य सर्वांचे आहे. हेडगेवार यांनी लढा दिला त्यांनी सुरु केलेले कार्य देशव्यापी बनले आहे. 3 हजार वर्षापुर्वी भारत जागतिक मोठे आर्थिक केंद्र होते, इथून अनेक वस्तु निर्यात केल्या जायच्या. तक्षशिला, नालंदा यासह अनेक ठिकाणी विश्वविद्यालय चालवले जायचे, तिथे 10 हजार विद्यार्थी एका वेळेस शिक्षण घ्यायचे. अनेक महान राजे जग जिंकणारे इथे होते. अंकगणित, बीज गणित यासह नक्षत्र व अंतराळ, वैदिक, व्याकरण भाषा, कपडे, परिमाण व्यवस्था, कृषी व तंत्रज्ञान हे भारताने जगाला दिले.
काही परकीय लोक आले व त्यांनी देशात जझिया कर आकारला, धर्मातर केले, अनेक अत्याचार 1 हजार वर्ष केले. भारताने कधी कुणाला लुटले नाही, महिलावर अत्याचार केला नाही. अध्यात्मत श्रेष्ट असताना भारतात अत्याचार झाले. देशात जातीय, आर्थिक, भाषा, वर्ण विभाजन झाल्याने परकीय आक्रमण झाले. भारतातील सगळे राजे एकत्र आले नाहीत, गझनी, गौरी, अबद्दली, बाबर,इस्ट इंडिया कंपनी, इंग्रज यांच्या विरोधात एकत्र आले नाहीत हे लोक एक एकाला हरवत आले आणि जिंकले, ते एकत्र कधी आले नाही. हिंदू समाज माझा आहे असा भाव निर्माण झाला पाहिजे. यातूनच डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.
देशाची दुर्दैशेला परकीय, इंग्रज जबाबदार नसुन भारतीय आहेत. कर्मकांड व रूढीमध्ये आपण अडकुन राहिलो. हेडगेवार यांनी देशात शाखा सुरु केल्या, मणिपूर, आसाम, लेह लड्डाख, जैसलमेर, अंदमान निकोबार अश्या अनेक ठिकाणी आता शाखा सुरु आहेत.
इस्लाम व इसाई पेक्षा हजारो वर्ष जुना हिंदू समाज असुन इतिहास, कर्मकांड, अध्यात्म, विविधता आहे. सन्मान, धोका न देणे ह्या भावांना मानणारा हिंदू आहे. हिंदुत्व मर्यादित नसुन त्यात अनेक ग्रंथ, पुस्तके, रूढी परंपरा आहेत. जो सगळ्यांची चिंता करतो, काळजी घेतो,जीवन जगण्याची पद्धती देतो, संस्कार शिकवतो, समाजात राहायला शिकवतो तो हिंदू आहे, आता हे जगाला कळत आहे. अमेरीका, रुस व इतर देशातील लोक आता भारतात हिंदू समजण्यासाठी येत आहेत.
स्वयंसेवक संघाच्या विविध 40 संघटना सेवा कार्य करीत आहेत. रुग्णालय, शिक्षण सारख्या विविध क्षेत्रात मोफत सेवा संघ देत आहे. दुध, कृषी उत्पन्नत देश पुढे असुन प्रगती करीत आहे. संविधान कसे बनले त्यासाठी काय कष्ट प्रयत्न झाले हे माहिती करून घेतले पाहिजे. धर्म चक्र हे निरंतर सुरु राहणार आहे. देशात चांगले नागरिक बनविणे हे सांगजाचे ध्येय आहे. अनेक जण मतदान करीत नाहीत, जे करतात त्यातील काही प्रलोभनातून करतात. सगळा समाज आपला आहे असे म्हण्टले पाहीजे, सामाजिक समरसता असली पाहिजे. स्वतंत्रता, बंधुत्व व समानता हे तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, हे डॉ आंबेडकर यांनी संविधान सभेत सांगितले.
पर्यावरण संवर्धन केले पाहिजे, देशातील 50 टक्के जमीन सिंचनाखाली नाही. ग्लोबल वर्मिंग प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे झाडे लावावीत, प्लास्टिक वापर करू नये. कोळसा पेट्रोलिंग डिझेलचा बेसुमार वापर होत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. पर्यावरण हा विषय संघाने हातात घेतला आहे. कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, मातृ भाषा या विषयावर संघ काम करीत असुन प्रयत्नशील आहे. तरुण पिढीत आत्महत्या, नशेबाजी वाढली आहे, सरकार काम करेल पण आपले सुद्धा कर्तव्य व जबाबदारी आहे. नशामुक्त भारत संकल्प असुन त्यासाठी आंदोलन उभे करणार आहोत.
देशात विकास, उन्नती होत आहे मात्र घर, गल्ली, परिवार याकडे लक्ष देऊन संस्कारमय पिढी घडवावी लागणार आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक भाव वाढणे गरजेचे आहे, समाजासाठी काही करावे लागेल. जगाला अध्यात्म देण्याचे काम करायचे आहे. संघाच्या या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. जो राष्ट्रभक्ती करतो, परंपरा पाळतो तो हिंदू आहे मग तो मुस्लिमसह इतर कोणत्याही धर्माचा असो त्याला आम्ही हिंदू मानतो असे ते म्हणाले.
अजय जानराव यांनी संघ स्थापना, इतिहास, संघ कार्याची माहिती दिली. व्यापक गृहसंपर्क अभियान अंतर्गत स्वयंसेवक यांनी संघांचे कार्य पोहचवत पत्रक दिली, धाराशिव जिल्ह्यात 650 स्वयंसेवक यांनी 270 गावात जाऊन 35 हजार घरात संपर्क व संवाद साधला. हिंदू संमेलन अंतर्गत गाव, वस्ती स्तरावर कार्यक्रम घेण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात 15 संमेलन झाले असुन आणखी 35 ठिकाणी संमेलन होणार आहे. सामाजिक सदभाव बैठका घेऊन त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. कळंब व उमरगा येथे 3 मे रोजी “प्रमुख नागरिक संगोष्ठी” (परिसंवाद) कार्यक्रम होणार असल्याचे जानराव यांनी सांगितले.











