धाराशिव – समय सारथी
धाराशिव तहसील कार्यालयाने तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महसूली वसुलीचे उदिष्ट पुर्ण केले आहे. जमीन महसुलात 143 टक्के तर गौण खनिजात 98 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. यासाठी उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयित आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे महसूल वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविण्यात यश आले आहे. धाराशिव तालुक्यासाठी 600 लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 863.85 लाख रुपयांची वसुली करण्यात येऊन 143.98% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली असून, ही जिल्ह्यातील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. या कामगिरीतून धाराशिव तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल वसुली करून प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित केली आहे.
गौण खनिजात शासकीय महसूल वसुली सुद्धा करण्यात आली. गौण खनिज विभागांतर्गत 1300 लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी 1269.52 लाख रुपयांची वसुली करून 97.66% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. या विभागातही धाराशिव तालुका प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
महसूल वसुली प्रक्रियेत शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. थकबाकीदारांना नियमानुसार नोटीस बजावणी, लागू कायद्यांनुसार वसुली कारवाई,नागरिकांमध्ये जनजागृती मोहिम, गाव व मंडळ स्तरावर नियमित आढावा बैठक या उपाययोजनांमुळे महसूल वसुलीत गती, पारदर्शकता व शिस्त निर्माण झाली.
धाराशिव तहसील कार्यालयाने शासकीय जमीन महसूल व शासकीय गौण खनिज या दोन्ही विभागांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले आहे. ही कामगिरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरत असून, भविष्यातही हीच गती कायम ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांचे नेतृत्व महसूल व्यवस्थापनासाठी आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे.












