धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या 140 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली असुन तसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर नगर विकास विभागाने तसे पत्र धाराशिव मुख्याधिकारी यांना दिले. निर्देश व आदेश मिळताच मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी ठेकेदार याला पुढील आदेशापर्यंत कामास सुरुवात करण्यात येऊ नये असे पत्र दिले त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या ‘तोंडी’ निर्देशाची वेळ टाकली तर त्या पत्राला उत्तर देताना ठेकेदार अजमेरा यांनी 2 रस्त्याचे सर्वे केल्याचे पत्र दिले व त्यासाठी पुरावा म्हणुन वेळेसह जीपीएस लोकेशन असलेले फोटो दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव मुख्याधिकारी नीता अंधारे यांना सकाळी 11.57 वाजता फोनकरून कामास स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे ठेकेदार अजमेरा यांनी स्थगिती दिल्याचे व काम सुरु न करण्याचे पत्र मिळताच त्याला उत्तर दिले. त्यात त्यांनी 2 रस्त्याचे सर्वेक्षण केल्याचे व काम सुरु केल्याचे पत्र दिले. त्यात त्यांनी जे फोटो जोडले आहेत त्यात वेळ सकाळी 11.42 ते 11.50 या दरम्यानची दाखवली आहे. आधी स्थगितीचे निर्देश की आधी सर्वे व काम सुरु असा काहीसा हा ‘खेळ’ रंगला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे हा विषय गेल्याची कुणकुण नगर परिषद, ठेकेदार व संबंधित राजकीय नेतृत्वास लागताच हालचाली झाल्या. तात्काळ सगळी यंत्रणा तयार करीत वेळेचे ‘गणित’ घालण्यात आले. नगर परिषदेचा ‘मराठी’ तर ठेकेदार अजमेरा यांचा ‘इंग्रजी’ भाषेत झालेला पत्र’व्यवहार’ यानिमित्ताने चांगलाच चर्चेत आला असुन तो आगामी काळात वादाचा व कळीचा मुद्दा ठरणार आहे. अर्थकारण करून कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचा पालकमंत्री सरनाईक यांचा आरोप आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह या कामाचे भुमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन व आखणी करीत होते. उदघाट्न कुठे करायचे याचा सर्वे देखील केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मात्र त्या आधीच ‘लगीन घाई’ झाल्याने ठेकेदार अजमेरा यांनी नगर परिषदेच्या प्रतिनिधी यांना सोबत घेऊन ‘पंचनामा’ केला व जीपीएस लोकेशन व वेळ दर्शवणारे फोटो काढले आणि ‘नारळ’ न फोडताच काम सुरु केल्याचे दर्शवले.
ठेकेदार अजमेरा यांनी जे कामाचे फोटो जोडले आहेत त्यात जीपीएस व विना जीपीएस फोटो आहेत. ऐकावर वेळ आहे तर दुसरे मोकळे मात्र दोन्ही फोटोतील फ्रेम व लोकांची मुद्रा स्तब्ध आहे, जसे एखाद्या पुतळ्या सारखी, किंचीतसाही फरक नाही. ज्या 59 रस्त्यासाठी तब्बल 18 महिने पेक्षा अधिक काळ नागरिकांना प्रतीक्षा होती, ज्यावरून राजकारण रंगले आहे त्या कामाचा शुभारंभ झालेला धाराशिवकरांना माहितीही नाही, हे एकप्रकारे दुर्दैव म्हणावे लागेल. काम सुरु/उदघाटन झाले हो.. असे म्हणत फटाके फोडून खरी दिवाळी साजरी करण्याची कार्यकर्ते व नागरिक यांची संधी यानिमित्ताने हुकली, असेच म्हणावे लागेलं.
रस्ते कामाचे सर्वे करण्यासाठी अजमेरा यांनी रस्ता निवडला तो देखील स्वतःच्या घराजवळचाच.. त्यासाठी नगर परिषदेचे प्रतिनिधी तात्काळ हजर, हे सगळं अर्थात नियोजित.. ठेकेदार अजमेरा यांनी तहसीलदार निवास ते अजमेरा घर व ताजमहल चौक ते जिल्हा शासकीय रुग्णालय हे 2 रस्ते निवडले, म्हणजे कसं जास्त त्रास व धावपळ व्हायला नको. इकडे लोकांना खड्डे, त्रास व कळवळा असल्याचे कारण नेत्यांनी द्यायचे तर दुसरीकडे रस्त्याचा लाभ अर्थात काम सुद्धा ठेकेदार याच्या घरासमोरून..
अजमेरा ते तहसीलदार घर यांच्या घराजवळ ‘पार्किंग’ मध्ये असलेला जेसीबी व बांधकामातुन शिल्लक असलेली 10-15 टोपली ‘खडी’ फोटोत झूम केल्यावरच रस्त्याच्या कडेला पडलेली दिसत आहे. अश्या मोठ्या यंत्रणेतून ठेकेदार यांनी मोठ्या तयारीने काम सुरु केल्याचे दाखवले व ‘फोटोसेशन’ एकट्यानेच उरकले. 10-15 टोपल्यात कामाची सुरुवात हे ‘दिव्य’ काम केल्याने आगामी काळात कामाचा ‘दर्जा’ व ‘गती’ काय असणार आहे याचे ‘चिंतन’ सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.
बीड कॅपिसिटी व इतर मुद्यावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ‘बोट’ ठेवले होते, ते योग्य असल्याला या प्रकारावरून पुष्टी मिळते. 16 ऑक्टोबरला ठेकेदार यांना आदेश दिले त्यांनी 28 ऑक्टोबर म्हणजे 12 दिवसांनी कामाचे सर्वेक्षण व काम सुरु केल्याचे दाखवले, या 12 दिवसाच्या काळात त्यांना काम सुरु करण्यासाठी केवळ 15-20 टोपली खडी मिळाली. एकंदरीत हे सगळं कागदोपत्री ‘ताळमेळ’ व ‘वेळ’ दाखवीत कायदेशीर फायदा उचलण्यासाठी केलेले ‘कांड’ असुन यात काही राजकारणी व अधिकारी सहभागी आहेत.
रस्त्याच्या कामाच्या दर्जाची हमी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. चांगले दर्जेदार काम करून घेतले जाईल असे ते म्हणाले. एकंदरीत ते ‘गुणवत्ता नियंत्रका’ ची भुमिका या कार्यात पार पाडणार आहेत असेच दिसते त्यामुळे त्यांचाही ‘कस’ लागणार आहे. अजमेरा हेच शहराचा विकास करू शकतात, त्यांना काम द्यावे असा राज’हट्ट’ त्यांचा आहे. जनतेला होणारा त्रास व कळवळा या ‘गोंडस’ कारणाच्या नावाखाली ‘मलिदा’ खाण्याचा ‘डाव’ आहे, नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर हे सुचावे हे लोकांचे दुर्दैव.
अजमेरा यांच्या पत्रातील मुद्दे –
16 ऑक्टोबर च्या पत्रानुसार कंत्राटदार यांनी 2 रस्त्याचे सर्वेक्षण आधीच पुर्ण केलेला असुन त्यावेळी धाराशिव नगर परिषदेचे प्रतिनिधी होते, त्याचे फोटो जोडले आहेत. उर्वरित रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे आणि बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
28 ऑक्टोबरच्या पत्रानुसार पुढील आदेशापर्यंत काम स्थगित ठेवा असे आदेश दिले आहेत. आपल्या सूचनेनुसार काम सुरू झाल्यानंतर अशा स्थगितीमुळे प्रकल्पावर आर्थिक आणि वेळेचा परिणाम होतो. कोणताही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी लवकरात लवकर या संदर्भात योग्य निर्देश जारी करावेत. करारांतर्गत कंत्राटदाराच्या हक्काना बाधा आणू नये असे म्हणटले आहे.












