धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन धाराशिव येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करीत विजयाचा संकल्प केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन करुन त्यांच्या साक्षीने पालकमंत्री म्हणाले की, आपल्याला 2024 ची धाराशिव लोकसभा जागा विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे हात बळकट करण्यासाठी विजयी करायची आहे. शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे व भाजप नेते जो उमेदवार देतील तो उमेदवार प्रचंड मताने निवडून त्याला संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे त्यासाठी या कार्यालयाचे उदघाटन करीत आहोत. लोकसभा निवडणूक अंतर्गत जे जे पक्षाची कामे, मतदार यादी, प्रचार यासह वॉर रूम येथे असणार आहे.
डॉ सावंत हे आता थेट जनसंपर्क कार्यालय माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भुम परंडा, कळंब यानंतर आता धाराशिव शहरात लोकसभा जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.
राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री तानाजीराव सावंत यांची भुमिका महत्वाची राहिली आहे, ते किंगमेकर व जाईंट किलर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे आहे त्यातच सावंत यांनी जनसंपर्क कार्यालये सुरु केल्याने कार्यकर्त्यांत नवंचैतन्य पसरले असुन आतापासुनच कामाला सुरुवात केली आहे
अगदी काही महिन्याच्या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार असल्याने या निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी सर्वांना आपले संपूर्ण योगदान द्यावे लागणार आहे. यासाठीच धाराशिव लोकसभा जिंकणे हे आपले इथून पुढचे लक्ष असणार आहे असे ते म्हणाले. तेव्हा सर्वांनी यासाठी कामाचे योग्य नियोजन करत जबाबदाऱ्या वाटून घेत कामाला लागायला हवे. त्याच पार्श्वभूमीवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयात लोकांनी हक्काने त्यांच्या समस्या घेऊन याव्यात असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, महिला जिल्हाप्रमुख भारती गायकवाड, तुळजापूर तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ, आनंद पाटील, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.