धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा उमेदवार अंतीम झाला असुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करुन अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या उमेदवार असु शकतील. लोकसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना पुन्हा एकदा रंगु शकतो. पक्षवाढीसाठी एखादा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल व त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे सुचक विधान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडुन केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे परभणी येथे महादेव जानकर यांची उमेदवारी अर्ज भरण्यास गेले असुन ते मुबंईत आल्यावर आज उशीरा किंवा उद्या सकाळी पक्षप्रवेश व उमेदवारी घोषणा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.
धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे.कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या. शिक्षक आमदार तथा विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर मात्र त्यांची 4 वर्ष टर्म / कार्यकाळ शिल्लक असल्याने पक्ष संभ्रमात होता तर सुरुवातीपासुन सुरेश दाजी बिराजदार हे चर्चेत होते.
सौ अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रम आयोजन केले आहे.
धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार ह्या महिला असुन 10 लाख 58 हजार पुरुष मतदार आहेत. महिला उमेदवार आल्यास महिला मतदारांचे मत निर्णायक ठरू शकते.
अर्चना पाटील यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करीत सुचक पोस्ट –
ओमराजे निंबाळकर उमेदवार की गुन्हेगार अश्या आशयाचे व्हाटसअप स्टेट्स ठेवत अर्चना पाटील यांनी टीका केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नराधम व ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्याचा दाखला देत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये खासदार ओमराजे यांचा नराधम असा उल्लेख करीत ओमराजे यांना डीवचले होते.