धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे ग्रामपंचायत येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोकी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मन्मथ सुभाष आवटे (रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव), डी. के. पाटील (कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव, रा. काकडे प्लॉट, धाराशिव) तसेच के. एन. साठे (उपअभियंता, बांधकाम विभाग जि.प. धाराशिव, मयत) यांनी संगनमत करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
14 जानेवारी ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायत कसबे तडवळे येथील मधुकर प्लॉटिंग परिसरात सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच हावळे प्लॉटिंग येथे रस्ता व नाली बांधकामासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण 7 लाख रुपये मंजूर करून घेतले. मात्र प्रत्यक्षात काम न करता शासन निधीचा अपहार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी फिर्यादी संजय संतराम ढाकणे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 409,420,467,468 व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.












