धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी पिंटू सुर्वे याला सोलापूर येथून अटक करुन कोर्टासमोर हजर केले त्यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी पुन्हा एकदा तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले. यापुर्वी कोर्टाने 2 वेळेस पोलिसांना फटकारत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते, यात राजकीय दबाव आहे का असे कोर्ट म्हणाले होते. त्यानंतर देखील 19 जुनला सुनावणीवेळी सुद्धा कोर्टाने फटकारले, सुर्वे याला 7 दिवसांची कोठडी दिली आहे. तस्कर व सेवन गट असे वर्गीकरण व इतर बाबी पोलिसांसाठी कोर्टात भुमिका मांडताना अडचणीच्या ठरत आहेत.
दोषारोप पत्र दाखल करताना सुर्वे याचे इतर आरोपी सोबत आर्थिक व्यवहार दिसुन आले होते मग त्यावेळी किंवा तपास करताना सुर्वेला आरोपी करावे हे आधी लक्षात का आले नाही असा सवाल कोर्टाने केला. बँक व्यवहार होते, साक्षीदार यांचे जबाब आधीच घेतले होते तर मग दोषारोप पत्रानंतर आता नवीन काय सापडले ते सांगा ? असे न्यायाधीश मिटकरी म्हणाल्या. कोर्टाने प्रश्न विचारल्याने काही बाबी उघडया पडल्या.
जुने व नवीन आर्थिक व्यवहार सापडले असुन त्याचा तपास करणे आहे असे ठाकुर म्हणाले. सुर्वे याचे अमित अरगडे, युवराज दळवी सोबत ड्रग्ज खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार व्यवहार सापडले असुन गजानन हंगरगेकर, प्रसाद घोटण कदम परमेश्वर, विनोद उर्फ पिंटू गंगणे याच्याशीही आर्थिक व्यवहार सापडले आहेत तसेच काही साक्षीदार यांनी सुर्वे हा ड्रग्ज विकत असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. सर्वे याचे इतर आरोपी सोबत जवळपास 5 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार सापडले आहेत असे ठाकुर म्हणाले.
राजू उर्फ पिंटू सुर्वे याने सांगितले की त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते, तो गेला होता मात्र त्याला नोटीस दिली नाही. त्यावर तपास अधिकारी ठाकुर यांनी सांगितले की, त्याला मार्च महिन्यात एक वेळेस बोलावले व नंतर सोडून दिले. गेली 1 महिन्यापासुन आम्ही त्याचा शोध घेत असुन त्याच्या विरोधात आणखी पुरावे मिळाले आहेत असे ठाकुर म्हणाले.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी सोलापूर येथून राजू उर्फ पिंटू सुर्वे या आरोपीला अटक केली त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी बाजु मांडली तर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात स्वतः हजर राहून तपासाचे मुद्दे मांडले.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर येथील पिंटू सुर्वे व मुंबई येथील अतुल अग्रवाल यांची नावे पोलिसांकडे आरोपी व साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबात असल्याचे म्हणटले होते, त्यावेळी त्यांनी दोषारोप पत्र पत्रकार परिषदेत दाखविले होते. पोलिसांनी या दोघांना आरोपी केले नसल्याचा आरोप केला होता, त्यातील सुर्वे याला अटक केली आहे तर अग्रवाल बाबत काय झाले हे गुलदस्त्यात आहे, ते कळू शकले नाही.