धाराशिव – समय सारथी
औसा तुळजापूर रस्त्यावरील भंडारवाडी शिवारातील हॉटेल रिलॅक्स येथे गोळीबार करून हॉटेल चालकाच्या वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे व अभिषेक उध्दव विश्वकर्मा यांना न्यायालयाने दोषी ठरवित दोन्ही खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कठोर शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश टी जी मीटकरी यांनी शिक्षा सुनावली.
3 फेब्रुवारी 21 रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान आरोपी हॉटेल रिलॅक्स येथे जेवणाच्या कारणावरून आले होते. यावेळी आरोपी अर्जुन बडवणे याने जमिनीवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून दहशत निर्माण केली. त्यानंतर हॉटेल चालकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. दरम्यान आरोपी अभिषेक विश्वकर्मा याने चाकूने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचे वडील बाळासाहेब दामोदर मोरे हे हॉटेलमध्ये आले असता, अर्जुन बडवणे याने त्यांच्यावर थेट गोळीबार केला. गोळी बाळासाहेब मोरे यांच्या डाव्या बाजूस लागून शरीरात अडकली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल व नंतर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेद्वारे गोळी काढण्यात आली.
घटनेनंतर अविनाश बाळासाहेब मोरे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे यांनी घटनास्थळी दाखल होऊन गावठी पिस्तुलाची गोळी, कव्हर, चाकू, रक्ताचे नमुने व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. आरोपी अर्जुन बडवणे याच्याकडून यापूर्वी गंगाखेड हद्दीत दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले गावठी पिस्तुलही पुराव्यादाखल सादर करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी देशमुख व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. एस. सूर्यवंशी यांनी एकूण 15 साक्षीदार तपासले. सादर पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी अर्जुन बडवणे व अभिषेक विश्वकर्मा यांना भादंवि कलम 307 व 352 तसेच शस्त्र अधिनियम कलम 25 व 27 अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड, तसेच शस्त्र अधिनियमान्वये 7 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. प्रकरणाचा तपास सपोनि एम जी शेंडगे यांनी केला असून कोर्ट पैरवीचे काम पोलीस अंमलदार आशिष नागमोडे यांनी पाहिले.












