धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्यावर बांधकाम परवाना संचिका गहाळ केल्याप्रकरणी आनंद नगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेखे अधिनियम 2005 चे कलम 7,8 व 9 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केंद्रे यांच्यावर यापुर्वी सुद्धा अनेक प्रकरणात ठपका ठेवण्यात आला असुन गुन्हा नोंद झाल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. गुन्हा नोंद झाल्यापासुन केंद्रे हे फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
धाराशिव नगर परिषद विविध घोटाळ्यांनी राज्यभर गाजली असुन 7-8 वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. धाराशिव नगर परिषदेतील विविध कामात झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अवर सचिव रवींद्र औटे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले असून समिती स्थापन करुन तपास करण्याची कारवाई सुरु करावी असे नमूद केले आहे त्यामुळे एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरु करणे गरजेचे आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर परिषदेत अपहार व अनेक कामात घोटाळे झाल्याची तक्रार केली होती तसेच विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री यांनी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. समिती गठीत करण्यात आल्याने भ्रष्ट अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले आहे.
बायोमायनिंग प्रकरण, गुंठेवारी यासह अन्य अंतीम टप्प्यात आहेत त्यामुळे ही एसआयटी सर्व मुद्याचा तपास करणार आहे.