धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची रॅली काढण्यात आली, या रॅलीत चाकू बाळगल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत कारवाई केली आहे. सहदेव कानडे तीर्थ खुर्द असे या आरोपीचे नाव असुन पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील कारवाई केली आहे.
तुळजापूर शहरात समाजवादी पक्षाचा मेळावा आयोजित केला होता, अबु आझमी यांची रॅली सावरकर चौक येथे आल्यावर रॅलीच्या गाडी मागे एक तरुण वारंवार टी शर्टच्या आत हात लावत असल्याने पोलीस हवालदार राऊत यांना संशय आला, त्यानंतर त्यांनी त्या तरुणाला बाजूला घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडे 34 सेमी लांबीचा धारधार चाकू सापडला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस नाईक वैभव देशमुख यांनी फिर्याद दिल्यानंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार संतोष करवर यांनी तपास करुन पुढील कारवाई केली. चाकू बाळगण्याचा हेतुचा पोलीस शोध घेत आहेत.