धाराशिव – समय सारथी
परवानगीशिवाय मार्ग बदलून समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांची रॅली काढल्या प्रकरणी तुळजापूर येथील नेते देवानंद रोचकरी यांच्यासह 150 कार्यकर्त्यांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी तुळजापूर शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमुळे चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी दिलेल्या मार्ग व वेळेचा फज्जा उडवत आयोजकांनी परस्परच मंदिर परिसरातून रॅली काढल्यामुळे आयोजक देवानंद रोचकरी यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पूर्वपरवानगी दिलेला मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळवार पेठ, कमान वेस, मुख्य धाराशिव रोड ते पुजारी मंगल कार्यालय असा ठरवण्यात आला होता. वेळही सकाळी 11.30 ते 12 या दरम्यान निश्चित होती. मात्र, आयोजकांनी वेळ बदलून दुपारी 2 ते 2.30 दरम्यान रॅली काढत थेट तुळजाभवानी मंदिरासमोरील भाविकांच्या गर्दीच्या मार्गावरून चारचाकी वाहनांसह रॅली काढली.
या प्रकारामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती आणि भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागला. “रॅलीसाठी वेळ व मार्ग निश्चित करूनही त्याचे उल्लंघन केल्यामुळे आयोजक व अन्य कार्यकर्त्यांविरोधात भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” असे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे म्हणाले.