धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत धाराशिव येथील कोर्टाने पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत. इंद्रजीत देवकते यांनी क्रिकेट असोसिएशनच्या नावाने बोगस कागदपत्रे व फसवणूकीची तक्रार कोर्टात दाखल केली होती, त्यावर कोर्टाने सीआरपीसीचे कलम 202 प्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी चौकशी करुन 120 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ऍड विशाल साखरे यांनी याबाबत कोर्टात बाजु मांडली. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे. वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन दंडनाईक यांना अटक केली असुन ते न्यायालयीन कोठडीत आहेत त्यातच हे आदेश 24 जानेवारी रोजी दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्ता बंडगर यांनी आपापसात संगनमत करुन या संस्थेची नोंदणी रद्द झालेली असताना महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड संलग्नित खेळाडू यांची निवड करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध केली तसेच बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांची फसवणूक केली.
ऑडिट व इतर कागदपत्रे न दिल्याने सार्वजनिक न्यास कार्यालयाने 1 जानेवारी 2018 रोजी उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघटनेची नोंदणी स्वतःहून चौकशी करुन रद्द केली व संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले. संस्थेची नोंदणी रद्द केलेली असतानाही अध्यक्ष दंडनाईक यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत येणारा निधी व इतर सुविधा स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्या.
देवकते यांनी याबाबत धाराशिव येथील कोर्टात कलम 420,409,467,468,471 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करावा म्हणून तक्रार दाखल केली होती त्यावर कोर्टाने यात पोलिसांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार आहे.