धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अटक आरोपी विनोद गंगणे यांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, गंगणे यांना 6 जुन रोजी अटक केल्यानंतर त्यांना 2 वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली, 12 जुन रोजी पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील ऍड जयंत देशमुख यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली तर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी माहिती दिली.
पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली, वैद्यकीय कारणाने न्यायालयीन कोठडी देताना कोर्टाने पोलिसांना तपासासाठी भविष्यात पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. गुन्ह्यांचे स्वरूप, तपासात मोबाईल न देणे, पोलीस कोठडीतील जास्त काळ रुग्णालयात असणे यामुळे योग्य तपास झाला नाही असे म्हणत पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर आरोपीच्या वकिलांनी तात्पुरता जामीनासाठी अर्ज केला त्यावर कोर्टाने तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे म्हणणे मागितले, त्यावर निर्णय झालेला नाही. वस्तुस्तिथी व परिस्थितीजन्य बाबी व पुरावे पाहता गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी गरजेची आहे असे कोर्टाने म्हण्टले. एकंदरीत सगळ्या स्तिथी पाहता पोलिसांना तपासासाठी पर्याप्त काळ मिळाला नाही, अखेर मोबाईल सापडला नाही.
गंगणे यांना कोर्टात हजर केल्यावर त्यांनी पोलीसां विरोधात तक्रार नसल्याचे सांगितले. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तपास अधिकारी यांनी मागितली, भविष्यात जर पोलीस कोठडी लागली तर तो हक्क अबाधित ठेवुन न्यायालयीन कोठडी द्यावी असे तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी सांगितले. गंगणे हे 10 जुन ला सकाळी 10 वाजता रुग्णालयात वैद्यकीय कारणाने ऍडमिट झाले. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना तुळजापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर 11 जुनला 3 वाजता डिस्चार्ज केल्याचे ठाकुर यांनी कागदपत्रे सादर करीत सांगितले. गंगणे यांना पुन्हा 12 जुनला सकाळी 9 वाजता त्रास सुरु झाला त्यांना तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर दुपारी 3 वाजता डिस्चार्ज दिला असे ठाकुर म्हणाले.
गंगणे यांना छातीत दुखणे, किडनी, पोटाचा त्रास होता असे गंगणे यांनी सांगितले. माझ्या प्रश्न उत्तरे देईपर्यंत उभे रहा, असे कोर्टाने सांगत प्रश्न विचारले. त्यावर गंगणे म्हणाले की, 2019 पासुन त्रास सुरु आहे. तुम्ही खरे सांगता की पोलीस कोठडीत न राहण्यासाठी बोलता असे कोर्ट म्हणाले त्यावर गंगणे म्हणाले की आपणं ठाकुर यांना विचारा. कोर्ट म्हणाले मी पोलिसांना कसे कळेल की तुम्हाला काय त्रास आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरकडुन कार्डीओलॉजी करुन घ्या असा सल्ला डॉक्टरने दिला आहे त्यानुसार तपासणी करणे आहे असे ठाकुर म्हणाले.
पोलिसांनी हाऊस सर्च केली असुन तपासात पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती पोलिसांना दिली, तपासात सहकार्य केले. आरोपीची सध्या तब्येत खालवली आहे, ड्रग्ज व्यसनमुक्त झाल्यानंतरचा हा विथड्रॉ सिमटम (परिणाम) आहे त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्यावी अशी बाजु ऍड अजय गवळी यांनी मांडली. पोलीस कोठडीचा पोलिसांचा हक्क अबाधित ठेवू नये, प्लेन न्यायालयीन कोठडी द्यावी असे ते म्हणाले.
पोलीस कोठडी काळात आरोपी गंगणे हे अनेक काळ रुग्णालयात होते, पोलीस कोठडीतील काळ रुग्णालयात गेला त्यामुळे पोलिसांना तपास करता आला नाही, गुन्ह्याचे स्वरूप मोठे असुन अनेक बाबीचा तपास करणे शिल्लक आहे. वैद्यकीय कारण हा त्याचा आधार होऊ शकत नाही त्यामुळे भविष्यात पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवावा असे सरकारी वकील ऍड जयंत देशमुख म्हणाले.
गुन्ह्यांचे स्वरूप व इतर बाबी पाहता आणि 10 हजार पानाचे दोषारोपपत्र पाहता. गुन्ह्याचा तपास हा ड्रग्ज तस्कर, पेडलर, सपलायर व इतरांत झालेल्या आर्थिक व्यवहार यावर झाला आहे, यात तुळजापूर यथे ड्रग्ज सिंडीकेट असुन यांचे जाळे अनेक ठिकाणी पसरले आहेत. पोलीस कोठडी ही आरोपीचा गुन्ह्यातील सहभागी व गहाळ मोबाईल जप्त करणेसाठी होता मात्र तो दिला नाही. आरोपीने स्वतः व दुसऱ्यांचे मोबाईल वापरून ड्रग्ज खरेदी केले. गंगणे हे पोलिसांचे खबरी होते मग त्यांनी मोबाईल दिला नाही. तो दिला असता तर तपास करता आला असता, तो एक महत्वाचा पुरावा ठरला असता, त्यांचे ड्रग्ज तस्कर सोबत संपर्क होता. ते अनेक वर्षापासुन ड्रग्ज सेवनासाठी खरेदी करीत असल्याचा दावा गंगणे करीत आहेत. 12 लाख रुपयांचे ड्रग्ज त्यांनी खरेदी केले हे सगळे परिस्थितीजन्य बाबी पाहता गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर आहे. ड्रग्ज सिंडीकेट मोठे असुन ते पसरले आहे असे न्यायाधीश मिटकरी म्हणाल्या. तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टर यांच्याकडुन गंगणे यांची वैद्यकीय तपासणी करावी हे या स्तिथीत नाकारता येत नाही. आरोपीचा अधिकार महत्वाचा आहे त्याचं बरोबर नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था महत्वाची आहे.