धाराशिव – समय सारथी
कौटुंबिक व जमिनीच्या वादातुन एकाची 4 तुकडे करुन निर्घृण हत्या केल्या प्रकरणी धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खती यांनी एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एकाची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीनी मयताच्या पत्नीसमोर 4 तुकडे करुन खुन करीत तुकडे येडशी येथील जंगलात फेकून दिले होते. या प्रकरणात 16 साक्षीदार तपासण्यात आले, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पंडीत जाधव यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ऍड विशाल साखरे यांनी काम पाहिले. आरोपी पुतण्या महेंद्र याला जन्मठेप दिली तर भाऊ सोमनाथ याची निर्दोष मुक्तता केली. या खुन खटल्यात तपास अधिकारी म्हणुन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष खांडेकर, हवालदार चौधरी यांच्या पथकाने तपास केला, राज्यभर हा खुन खटला गाजला होता. पोलिसांनी अनेक पुरावे गोळा करुन त्याला जेरबंद केले होते.
अश्विनी भास्कर नागटिळक यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 302, 506,341,201,34 व शस्त्र अधिनियम 25(4) प्रमाणे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर 2018 रोजी आरोपी महेंद्र वामन नागटिळक व सोमनाथ रंगनाथ नागटिळक या 2 जणां विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीनी मयत भास्कर नागटिळक यांचा खुन करुन त्यांचे 4 तुकडे केले व ते रामलिंग येथील डोंगरात टाकून दिले. तलवारीने खुन केल्यावर तलवार पाण्याने धुवायला लावली. त्यांनी फिर्यादीच्या गळ्याला तलवार लावुन डोंगरात नेहले व एका झाडाला तारेने बांधून ठेवले व त्यानंतर तीच्या समोर 4 तुकडे केले.