धाराशिव – समय सारथी
13 व 6 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साहेबराव नारायण बोबडे या 79 वर्षीय आरोपीस कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 5 वर्ष सक्त मजुरी आणि 4 हजारांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 26 ते 29 नोव्हेंबर 2020 दरम्यान घडली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी व त्यानंतरच्या काही दिवसांत पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींना त्याच्या घरी बोलावून, घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला.
या प्रकाराची माहिती मुलींच्या आईला मिळाल्यावर तिने शिराढोण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कलम 376 भादंवि आणि POCSO कायद्यातील कलम 4, 8, 10, 12, तसेच कलम 452 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. गोडसे यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित दोन्ही मुलींची (वय अनुक्रमे 13 व 6 वर्षे) साक्ष निर्णायक ठरली.
अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचे कृत्य न्यायालयासमोर स्पष्ट केले. न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी बोबडे यास 5 वर्षे सक्त मजुरी व 3 हजार रुपये दंड, तसेच अन्य कलमांतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.