धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बहुचर्चित खुन प्रकरणात 2 आरोपीना कलम 302 अंतर्गत न्यायाधीश विश्वास मोहीते पाटील यांनी दोषी ठरविले असुन त्यांना जन्मठेपेची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.रामचंद्र येडगे व हरीश माशाळे अशी दोषी आरोपींची नावे असुन त्यांच्यावर 2020 मध्ये खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी यात सरकारची बाजु मांडली.
21 ऑक्टोबर 2020 रोजी धनाजी गवळी यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, ते व त्यांचे मित्र लक्ष्मण येडगे हे मोटारसायकलवरून शेतात गवत काढायला गेले त्यानंतर रामचंद्र येडगे व त्यांचा मेहुणा हरीश माशाळे हे तिथे आले व लक्ष्मण यांना दगडाने मारहाण केली व खुन केला, या प्रकरणात 8 साक्षीदार तपासण्यात आले. आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी राजेश मेहेत्रे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर सगर यांनी काम पाहिले.
नळदुर्ग येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य रित्या जामीन देण्यासह विविध तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाळ अग्रवाल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. न्यायाधीश, सरकारी वकील व इतरांनी संगणमत करुन उच्च न्यायालयाने जामीन बाबत काही लेखी सुचना व आदेश दिलेले असतानाही ते आदेश बाजूला ठेवून अग्रवाल यांनी खुनातील आरोपीला जामीन दिली.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढे येऊन आरोपीचा जामीन स्वीकारण्याचे नाकारले त्यानंतर आरोपीने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेव्हा उच्च न्यायालयाने प्रमुख न्यायाधीश शेंडे यांनी स्वतः घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करीत कडक शब्दात ताशेरे ओढले त्यामुळे हा खुन खटला राज्यभर चर्चेत आला होता, त्याच प्रकरणात कोर्टाने 2 आरोपीना दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.