धाराशिव – समय सारथी
सावत्र अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापास धाराशिव येथील जिल्हा न्यायालयाने 10 वर्ष सक्तमजुरीची व 51 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती शासकीय अभियोकता महेंद्र देशमुख यांनी दिली,अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही जी मोहीते यांनी हा निर्णय देत शिक्षा सुनावली.
पिडीत मुलीच्या आईचे 10 वर्षापुर्वी आरोपीशी लग्न झाले होते त्यानंतर मुलगी ही 10 वीपर्यंत मुंबई येथे आजीकडे शिक्षणासाठी होती मात्र त्यानंतर ती आईकडे पुढील शिक्षणासाठी नळदुर्ग येथे आली. आई,मुलगी, लहान भाऊ व सावत्र वडील हे असे राहू लागले. 10 जानेवारी 2022 रोजी पीडितेची आई ही बाजार आणण्यासाठी गेली असता ती घरात एकटी होती त्यावेळी आरोपी बाप हा हातात कुऱ्हाड घेऊन घरी आला. पिडीत मुलीला त्याने अंगावरील सगळे कपडे काढायला लावुन तीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.घडलेली घटना कोणाला सांगितल्यास तिला व तीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.
पिडीत मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यावर नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. या खटल्याची सुनावणी मोहीते यांच्या कोर्टात झाली यात 8 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले तर बचाव पक्षाच्या वतीने 1 साक्षीदार तपासण्यात आला. समोर आलेला पुरावा व सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मोहीते यांनी आरोपी बापाला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 51 हजार दंडापैकी 50 हजार हे पिडीत मुलीस द्यावे असा निर्णय दिला.