धाराशिव – समय सारथी
देशात राष्ट्रीय पातळीवर खा. राहुल गांधी आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश पदाधिकारी बंटी पाटील, विश्वजित कदम हे भाजपसोबत एकाकी झुंज देत आहेत. सध्या महापालिका आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मंत्री आ. अमित देशमुख गढी उतरून कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर आले आहेत. पण धाराशिव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे गढी उतरून बाहेर येण्यास तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे.
कधीकाळी काँग्रेचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. याबाबत धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव उमेश राजेनिंबाळकर यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, निवडणुकांमध्ये भाजपा सर्व रणनीतीचा वापर करून सत्ता काबीज करत आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एकही नगर परिषदेत यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. सध्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळावे यासाठी अमित देशमुख गढी उतरून रस्त्यावर येऊन कार्यकर्त्यांना बळ देत आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे वाड्याबहेर येण्यास तयार नाहीत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी बूथ प्रमुख किंवा अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. गतवेळी 13 नगरसेवक असलेल्या धाराशिव नगर परिषदेत यावेळेस मात्र 13 उमेदवार मिळू शकले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेते आणि पदाधिकारयांनी धाराशिव जिल्ह्यात लक्ष द्यावे अशी मागणी केली.












