धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सिद्धार्थ अंगुल भाऊ बनसोडे नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी मुंबई येथे मंत्री जयकुमार गोरे याबच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. स्थानिक गटबाजीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडल्याचा आरोप बनसोडे यांनी केला. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने काँग्रेस नगरसेवक फोडण्याची खेळी खेळली व ती यशस्वी केली. आगामी काळात राष्ट्रवादी शप गट व शिवसेना उबाठा गट फोडाफोडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे धाराशिव शहराध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक अमित शिंदे, नप उपाध्यक्ष अक्षय ढोबळे,नगरसेवक राहुल काकडे,नगरसेवक अभिजीत पतंगे, माजी नगरसेवक दत्ता पेठे उपस्थित होते.
धाराशिव नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असुन 41 पैकी 22 नगरसेवक भाजपचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना उबाठा 7, काँग्रेस 3 व एमआयएम 1 असे संख्याबळ होते. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असुन ती रोखण्यासाठी व संख्याबळ वाढवण्यासाठी ही फोडाफोडी केल्याची चर्चा आहे.
शिवसेना शरद पवार गटाचे भाजपला झुकते माप आहे तर शिवसेना उबाठा गटातील काही जण भाजपच्या संपर्कात असुन कामे दिल्याने मधुर मिलन सुरु आहे, त्याचंमुळे पालिकेतील विरोध सुद्धा मावळला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सुरु केली असुन पक्षप्रवेश व संघटन बांधणी हा त्याचाच भाग आहे.











