धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांना विनाशुल्क ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात दिली असुन एका कागदावर नगर परिषद, ग्रामपंचायत इथे अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन सादर केलेले अर्ज नंतर प्रशासन ऑनलाईन करणार असल्याने लाभार्थी यांची सोय होणार आहे, शिवाय ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लागणारे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज अंगणवाडी सेविका महिला, आशा कार्यकर्तेसह प्रशासन जमा करुन घेणार आहे, या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत केली आहे. महिनाभरात धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी यांनी केला असुन युद्धपातळीवर कामाला लागण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 15 जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
ग्रामीण भागासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर शहरी भागासाठी नगर पंचायत किंवा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत लागणारी कागदपत्रे द्यायची आहेत. उत्पन्न व इतर कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी गाव पातळीवर शिबीर घेण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. काही अडचणी असल्यास उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी घोषित करण्यात आलीय. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचा अर्ज व फोटो,आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल,सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत,रेशनकार्ड व सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे