पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे मार्गदर्शन – धनंजय सावंत यांची संकल्पना व पुढाकार
परंडा – समय सारथी
भैरवनाथ शिवशक्ती तालीम संघाच्यावतीने धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथे अत्याधुनिक सुविधा असलेले प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. 500 पैलवानाची निवासी व्यवस्था असलेल्या या केंद्रात स्विमिंग पुल, लाल माती व मॅट असणार आहे, यासाठी 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असुन 20 हजार सक्वेअर फुटचे बांधकाम केले जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय सावंत यांच्या संकल्पनेतुन आणि पुढाकारातुन हे केंद्र सुरु होणार आहे. इतके मोठी विद्यार्थी क्षमता असलेले हे अत्याधुनिक केंद्र पैलवानांसाठी एकप्रकारे कुस्तीचे विद्यापीठ ठरणार आहे.
कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख असुन ती जपण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखानाजवळ एक भव्य दिव्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची संकल्पना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी मांडली याला पालकमंत्री डॉ सावंत यांनी तात्काळ होकार दिला असुन स्वखर्चातुन हे केंद्र तयार करण्यात येणार आहे, या केंद्राचा बांधकाम नकाशा व इतर कामे पुर्ण झाली असुन लवकरच भुमीपुजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
स्वमिंग पुल, मॅट व लाल माती या दोन्ही गटातील प्रशिक्षण मैदाने, विद्यार्थी, प्रशिक्षक व डॉक्टर यांच्यासाठी निवास व्यवस्था याचं संकुलात केली जाणार आहे. मुलांना योग्य व तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण मिळावे यासाठी कुस्तीगीर परिषद, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक येथे पुर्णवेळ असणार आहे. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी इथे डॉक्टर सुद्धा असणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी हा महत्वाचा उपक्रम असणार आहे.
मुलांना सकस आहार मिळावा यासाठी गोपालन केंद्रही सुरु करण्यात आहे त्यामुळे दुध व तुप मिळणार आहे. परिसराजवळ 4 एकर जागेवर ऑरगॅनिक पद्धतीने पालेभाज्याची लागवड केली जाणार आहे, मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी इथे घेतली जाणार आहे. अनेक मुलांना कोल्हापूर, पुणे येथे प्रशिक्षण घेण्यासाठी जाता येत नाही, तिथे गेल्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होतो. ग्रामीण भागात हे सुरु झाल्यावर एक चांगल्या प्रकारची व्यवस्था होणार आहे.
सावंत परिवाराचे कुस्ती प्रेम हे सर्वश्रुत आहे. पालकमंत्री डॉ सावंत व धनंजय सावंत यांनी अनेक कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या असुन लाखों रुपयाची बक्षिसे दिली आहे. भुम परंडा या भागात अनेक तालीम सुरु करुन त्यांना आर्थिक मदत दिली आहे. मराठवाड्यात किंबहुना राज्यात 500 पैलवान एकाच वेळी असणारे हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे.