धाराशिव – समय सारथी
श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रे. सोसायटी लि.बीड संचालित शाखा कळंब व ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.बीड शाखा कळंब या शाखेतील ठेवीदाराने ठेवलेल्या ठेवीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी ठेवण्यास प्रवृत्त करुन ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठेव ठेवलेली रक्कम परत देण्यात कसुर केल्याप्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
सोसायटीच्या शाखेत ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत तसेच त्यांच्या ठेवीची मुदत संपूनही ठेवीच्या रक्कमा परत मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे बचत खात्यावरील रक्कम देखील परत मिळालेल्या नाहीत अशा ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या बचत प्रमाणपत्र,पासबुक व आधारकार्ड यांच्या छायांकित प्रतिसह आर्थिक गुन्हे शाखा,पोलिस अधिक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा.असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी केले आहे.