समजात चुकीचा संदेश जाईल, छळ होईल – सरकारी वकिलांचा युक्तिवाद – तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द
धाराशिव – समय सारथी
बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणी तुळजाई कला केंद्रावरील नर्तिका पूजा गायकवाडच्या हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या पूजा गायकवाडचा जामीन अर्ज श्रीमती व्ही.एस. मलकलपत्ते रेडडी, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळून लावला आहे, त्यामुळे तिचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
दरम्यान धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी तसा प्रस्ताव दिला होता. अनेक कला केंद्रात प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘मालक – मालकीण’ या परंपरेच्या नावाखाली मोठी लूट केली जाते. अनेकांचे संसार अक्षरशः उध्वस्त झाले आहेत.
जर आरोपी पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर केला, तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल. एवढेच नाही, तर हिच्यासारख्या महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी सादर केला. कोर्टाने तपासात आलेले पुरावे व इतर बाबी पाहता जामीन नाकारला.
बर्गे हे तुळजाई कला केंद्र येथील नर्तिका पुजा गायकवाड हिचेकडे जात असल्यामुळे, त्यांची ओळख होवून, ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले होते. पुजा हिने बर्गे यांना अट घातली होती की, “मी तुमची आज पासुन मालकीण म्हणुन काम करते परंतु तुम्ही माझे घरखर्च व माझा घरसंसार पाहायचा”. सदर प्रेमसंबंध सुरू असताना, नर्तिकी पुजा गायकवाड हिने स्वतःसाठी व तिचे नातेवाईकांसाठी महागडे मोबाईल, बुलेट गाडी, घराचे बांधकाम वैराग येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन, सोने नाणे इत्यादी गोष्टी प्रेमाच्या जाळयात अडकवून, गोविंद बर्गे यांच्याकडून प्राप्त करून घेतल्या.
गोविंद बर्गे यांनी गेवराईत मोठया हौशेने मोठा बंगला बांधला होता, हे पुजाला समजल्यानंतर तिने सदरचा बंगला बघण्याचा हट्ट धरला आणि तिला तो बंगला आवडल्याने, सदर बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा तिने गोविंद बर्गे यांच्याकडे सुरू केला. सदर बंगल्याची माहिती गोविंद बर्गे यांच्या संपूर्ण कुटुंबास असल्याने, सदरचा बंगला पुजा गायकवाड हिचे नावावर करण्यास नकार देवून, दुसरा बंगला घेवून देण्याचे आश्वासन गोविंद बर्गे यांनी तिला दिले. तरी सुध्दा, नर्तिकी पुजा गायकवाड हिने सदरचा बंगला तिचे नावावर करण्याचा तगादा लावून गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांचा मोबाईल ब्लॉक करून, बंगला नावावर करण्याचा आणि 5 एकर शेती घेवून देण्याचा आग्रह त्यांचेकडे धरला आणि ते न दिल्यास, गोविंद बर्गे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि अचानकपणे बोलणे बंद केले. सदर गोष्टीचा मानसिक त्रास गोविंद बर्गे यांना होवू लागल्याने, त्यांनी वारंवार नर्तिकी पुजा गायकवाड हिला भेटून तसे न करण्याबाबत विनंती केली. परंतु, नर्तिकी पुजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांचेशी बोलण्यास, भेटण्यास नकार दिला त्यानंतर तीला तुळजाई कला केंद्र येथे भेटले व त्यानंतर पुजाच्या आईकडे सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सासुरे येथे जाऊन गोविंद बर्गे यांनी पिस्टलने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली होती.
तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका असे 5 केंद्र बंद केले असुन महाकाली या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण कोर्टात असुन तिथे शपथपत्र दिले जाणार आहे.












