धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील अरविंद नागरी पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केलेले आकडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात साडे तीन कोटींच्या पुढे गेला असुन उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा सरकारी वकील यांनी त्याबाबतची कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. 3 ऑक्टोबरला न्यायाधीश बागे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी झाली यावेळी ठेवीदार यांनी चेअरमन रोहित दंडनाईक यांच्या जामिनीला विरोध करणारे शपथपत्र सादर केले यात पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक यांनी तब्बल 2 महिन्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला त्याची सुनावणी न्यायाधीश बागे पाटील यांच्या कोर्टात झाली त्यावेळी त्यांनी दोन्ही गुन्ह्याच्या प्रकरणातील वाद विवाद व युक्तीवाद एकाच वेळी ऐकू असे सांगितले. विजय दंडनाईक यांच्या जामिनावर 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. रोहित दंडनाईक यांना कोर्टाने अंतीम सुनावणीपर्यंत दिलासा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला होता.
जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या लिलावापुर्वी पाहणी करायला आलेल्या सोलापूर येथील शिलवंत माने यांना अरविंद पतसंस्थाचे चेअरमन रोहित याने हल्ला करीत मारहाण केली यासह इतर गुन्हे, कागदपत्रांची जंत्री पोलिसांनी कोर्टात सादर केली आहे तसेच हा गुन्हा केवळ 10 लाख रुपये पुरता मर्यादित नसुन प्राथमिक तपासात 3.55 कोटी झाला असुन आणखी आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी लेखी म्हणणे सादर करताना वर्तवली आहे.
आरोपी रोहित व इतरांनी या रकमेचा कोठे विनियोग केला शिवाय बँकेचे मूळ रेकॉर्ड, कार्यालय कोणत्या हेतूने बदलले, अपहाराच्या कटात सहभागी कोण ? अपहारीत रक्कम जयलक्ष्मी कारखान्यात गुंतवणूक केली आहे का ? वसंतदादा बँक व अरविंद बॅंकचे आर्थिक आणि गुन्हेगारी हितसंबंध तसेच दंडनाईक परिवारावर नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती देत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
लेखापरीक्षण अहवालात गंभीर त्रुटी असतानाही संस्थेवर तत्कालीन लेखापरीक्षक व संस्था नोंदणी निबंधक यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यावरून त्यांच्या भुमिकेवर संशय घेतला आहे त्यामुळे आगामी काळात तत्कालीन अधिकारी रडारवर येणार आहेत तर ठेवीदार यांची फसवणूक करुन खरेदी केलेली स्थावर व इतर मालमत्ता याचा तपास करायचा असल्याचे सांगत सरकारी वकिल ऍड शरद जाधवर यांनी जामिनीला विरोध केला आहे.
अरविंद बँकेचे चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळावर तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409,120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार 1 सप्टेंबर रोजी आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन यांचा तपास उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड करीत आहेत.
गुन्हा नोंद असलेल्या 10 लाख 25 हजार रकमेतील 50 टक्के रक्कम दंडनाईक याने कोर्टात भरली आहे. गुन्हा नोंद असलेली 10 लाख 25 हजार रक्कम गेल्या 9 वर्षांपासुन मिळालेली नसुन त्याची 14 टक्के व्याजासह रक्कम 35 ते 40 लाखात जाते, ती ठेवीदार यांना मिळणे अपेक्षित आहे त्यामुळे तक्रारदार व इतर ठेवीदार यांनी जमिनीला विरोध करीत शपथपत्र कोर्टात ऍड अजित खोत यांच्यामार्फत दाखल केले आहे.
तब्बल 10 वर्ष चकरा मारून देखील दंडनाईक यांनी पैसे दिले नाहीत अखेर कंटाळून ढोकी येथील पांडुरंग वाकुरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे इतर ठेवीदार यांना घेऊन तक्रार दिली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची तात्काळ दखल घेत गुन्हा नोंद केल्याने वाकुरे यांच्यासह अन्य ठेवीदार यांना तब्बल 10 वर्षानंतर न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.