धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. पवनचक्की कंपनी कर्मचारी व स्थानिक पवनचक्की कंपनीचे एजन्ट (व्हेंडर) यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाशी पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली असुन पोलिस तपास करीत आहेत. करोडो रुपयांच्या आर्थिक वसुलीतुन दबाव टाकण्यासाठी हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
अमोल लाखे याने स्थानिक तरुणांना सोबत घेत 6 ते 7 गाड्यांची तोडफोड व काही कर्मचारी यांना मारहाण केली आहे. अमोल लाखेचे पुणे येथील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध असुन लाखे हा वसुली करीत असल्याचा संशय पोलिसांना असुन तो त्यांच्या रडारवर आहे. चांदवड,घाटपिंपरी व पाथरूड या भागात रात्रभर धुमाकूळ घालुन मारहाण करण्यात आली आहे. या तोडफोडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या घटनेसंदर्भात पोलिसांना फोन केला असता अमोल लाखेन गोंधळ घातला असल्याची पोलिसांची पुष्टी वाशी पोलिसांनी दिली असुन तपास सुरु आहे. यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यातील भुम, परंडा, वाशी या भागात पवनचक्की माफियानी धुमाकूळ घालत दहशत माजवली आहे. शेतकरी यांच्या जमिनीचा ताबा मिळवून देणे, साईट क्लिअर करुन देणे यासह अन्य कामासाठी पवनचक्की कंपन्याकडुन लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. अनेक टोळ्या या भागात सक्रीय असुन त्यांना राजकीय पाठबळ आहे.