धाराशिव – समय सारथी
अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असुन यानिमित्ताने त्यांची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, विष्णु नारायणकर, नेताजी पाटील यांच्यासह अन्य मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले हे उपस्थितीत होते.
भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी मंत्री तथा नुकतेच काँग्रेसमधुन भाजपमध्ये आलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांनी पक्षप्रवेश पुर्वी अजित पवार यांची भेट घेत लॉबिंग केले व अर्चना पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि पक्ष प्रवेश सोहळ्यात सहभागी झाले.
धाराशिव येथे रंगणार पाटील निंबाळकर असा लोकसभेचा सामना रंगणार असुन परंपरागत लढत होणार आहे. महायुतीकडून अर्चना पाटील तर महाविकास आघाडीकडुन ओमराजे निंबाळकर असा सामना रंगणार आहे.
धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या.
सौ अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रम आयोजन केले आहे. धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार ह्या महिला असुन 10 लाख 58 हजार पुरुष मतदार आहेत. महिला उमेदवार आल्यास महिला मतदारांचे मत निर्णायक ठरू शकते.